विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारताविरुद्ध मानहानीकारक पराभवाला सामोरे जावे लागल्यानंतर आता पाकिस्तानच्या वतीने रडीचा डाव खेळला जात आहे. अहमदाबाद येथे भारत आणि पाकिस्तान दरम्यान एकदिवसीय सामन्यात प्रेक्षकांनी अनुचित वर्तन केल्याची तक्रार पाकिस्तान क्रिकेट मंडळाने आंतरराष्ट्रीय क्रिकेट मंडळाकडे केली आहे.
पाकिस्तान क्रिकेट मंडळाने सध्या सुरू असेलल्या विश्वचषक स्पर्धेत पाकिस्तानी पत्रकारांना आणि पाकिस्तानच्या क्रिकेटप्रेमींना व्हिसा देण्यास होणारा विलंब आणि व्हिसा धोरण नसल्याबद्दल आयसीसीकडे औपचारिक निषेधही नोंदवला. अहमदाबादमधील सामन्यात पाकिस्तानची फलंदाजी कोलमडली आणि भारताच्या अष्टपैलू कामगिरीमुळे भारताने हा सामना सहजच जिंकला. परंतु, नरेंद्र मोदी स्टेडिअमवर प्रेक्षकांच्या वर्तणुकीमुळे वादाला तोंड फुटले आहे.
पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमला नाणेफेकीच्या वेळी अहमदाबादच्या प्रेक्षकांकडून हुर्योचा सामना करावा लागला. पाकिस्तानचा भारताकडून पराभव झाल्यानंतर, सामन्यानंतरच्या पत्रकार परिषदेत, पाकिस्तानचे संघ संचालक, मिकी आर्थर यांनीही भारतावर टीका केली. पाकिस्तानच्या चाहत्यांच्या अनुपस्थितीचा हवाला देत या सामन्याचे आयोजन आयसीसीपेक्षा बीसीसीआयने (भारतीय क्रिकेट नियामक मंडळ) केल्यासारखे वाटले, अशी टीका त्यांनी केली.
हे ही वाचा:
निवडणुकीचे तिकीट मिळवण्यासाठी अंधारेंची धडपड, मंत्री शंभूराज देसाईंचा आरोप!
मुंबईत सैराट चित्रपटाची पुरावृत्ती; नव जोडप्याची हत्या, दोन्ही मृतदेह वेगवेगळ्या ठिकाणी टाकले
बायडेन यांच्या पाठोपाठ ऋषी सुनकही करणार इस्रायल दौरा?
गाझा पट्टीतील रुग्णालयावरील हल्ला कोणी केला?
पीसीबीनेही त्यांच्या अधिकृत एक्स खात्यावर या संदर्भात निवेदन जाहीर केले आहे. त्यात त्यांनी पाकिस्तानी पत्रकारांना व्हिसा देण्यात विलंब केल्याबद्दल तसेच, पाकिस्तानी क्रिकेटप्रेमींना व्हिसा देण्यासंदर्भात कोणतेही व्हिसा धोरण नसल्याबद्दल आयसीसीकडे औपचारिक निषेध नोंदवला असल्याचे नमूद केले आहे. सामन्यादरम्यान अहमदाबादमधील प्रेक्षकांच्या अनुचित वर्तनाबद्दल पीसीबीने तक्रारही दाखल केली आहे. आता पाकिस्तान २० ऑक्टोबर रोजी बेंगळुरू येथे ऑस्ट्रेलियाविरुद्ध आपला पुढचा सामना खेळणार आहे