ड्रग्ज प्रकरणी मुंबई पोलीसांकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. तस्कर ललित पाटील याला अखेर अटक करण्यात मुंबई पोलिसांना यश आले आहे. चेन्नईत मुंबई पोलिसांनी ललितच्या मुसक्या आवळल्या आहेत. पुण्यातील ससून रुग्णालयातून फरार झालेला ड्रग्ज माफीया ललित पाटील याचा शोध पोलीस घेत होते. त्यासाठी पोलिसांची दहा पथके देखील तयार करण्यात आली होती. अखेर रात्री चेन्नई येथे लपून बसलेल्या ललित याला अटक करण्यात आली. यानंतर ललित पाटील याला बुधवार, १८ ऑक्टोबर रोजी न्यायालयात सादर केले जाणार आहे.
पुणे पोलिस ललितच्या मागावर असताना साकीनाका पोलिस ललित पाटीलसाठी सापळा रचत होते. साकीनाका पोलिसांनी रचलेल्या सापळ्यात ललित पाटील फसला. साकीनाका पोलीसांच्या ताब्यात असलेल्या एका आरोपीला ललित पाटीलने नव्या नंबरवरून संपर्क केला. त्यानंतर तपासाला गती आली आणि साकीनाका पोलीसांनी गोपनीयता बाळगत तीन पथके ललित पाटीलच्या शोधासाठी तयार केली. दरम्यान, ललित पाटील आणि ताब्यात असेलल्या आरोपीचे रोज संभाषण होत होते त्यावरून पोलिसांना ललित पाटीलच्या हालचालींविषयी माहिती मिळत होती.
ललित पाटील एका ट्रॅव्हल कंपनीच्या कारने त्याच्या दोन सहकाऱ्यांसह आधी गुजरात, धुळे मग कर्नाटक आणि नंतर बंगळूरूला पोहचला. या सर्व प्रवासादरम्यान ललित हा अटक असलेल्या आरोपीच्या संपर्कात होता. अखेर एका हॉटेलमध्ये तो थांबलेला असताना साकीनाका पोलिसांनी सापळा रचून त्याच्यासह आणखी दोघांना ताब्यात घेतले. त्यानंतर बुधवारी त्याला मुंबईत आणण्याची शक्यता आहे.
प्रकरण काय आहे?
पुण्यातील ससून रुग्णालय परिसरात २ कोटी रुपयांचे ड्र्ग्ज सापडले होते. याप्रकरणी पुण्याच्या बंडगार्डन पोलीस ठाण्यात एनडीपीस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल झाला. या गुन्ह्यामध्ये आत्तापर्यंत चार आरोपींना अटक करण्यात आली असून यातील दोघांना उत्तर प्रदेशातील गोरखपूर जिल्ह्यातील बारंबाकी इथून दोघांना ताब्यात घेण्यात आलं आहे.
हे ही वाचा:
जरांगे पाटलांना समज कोण देणार?
श्वानांच्या मदतीने इस्रायलमधील पीडितांना देणार दिलासा
अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन बुधवारी इस्रायलच्या दौऱ्यावर
आता इस्रायलचे प्रमुख लक्ष्य हमासचा ‘क्रूरतेचा चेहरा’
या प्रकरणातील मुख्य आरोपी ललित पाटील हा फरार झाला होता. त्यानंतर पोलिस यंत्रणेवर ताशेरे ओढले जात होते. ललित पाटील याला ड्रग्ज प्रकरणात पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर ससून रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आलं होतं. येथे ९ महिने उपचार घेतल्यानंतर तो पोलिसांच्या हातावर तुरी देऊन फरार झाला. पोलिसांनी चौकशीदरम्यान ललितसह त्याचा भाऊ भूषण हे दोघे मिळून नाशिक इथं ड्रग्ज बनवण्याचा कारखाना चालवत असल्याचं समोर आलं आहे.