दक्षिण दिल्लीमधील लाडो सराई भागात टॅक्सीतच एका २३ वर्षीय तरुणीवर १३वेळा वार केल्याची घटना गुरुवारी सकाळी घडली. या तरुणाचे नाव गौरव पाल असून टॅक्सीचालक आणि स्थानिकांनी त्याला जेरबंद केले आहे. त्याच्यावर हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला असून त्याला शुक्रवारी न्यायालयात हजर केले जाणार आहे.
पीडित तरुणी प्राची मलिक जखमी आहे. गेल्या दोन वर्षांपासून ते दोघे मित्र होते, मात्र गेल्या काही दिवसांपासून ती त्याच्याकडे दुर्लक्ष करत होती. गुरुवारी सकाळी प्राची ही विश्वास नगरमधील एका मुलाखत कार्यशाळेत जात होती. त्यासाठी तिने टॅक्सी बुक केली होती. एका इंटरनॅशनल फर्ममध्ये रिक्रूटर म्हणून काम करणारा पाल तिची वाटच पाहात होता. तो त्याच्या गाडीमधून घटनास्थळी पोहोचला होता. ‘बुधवारी पाल याने प्राचीशी सकाळी आठ वाजता बोलणे केले. तेव्हा तिने त्याला सकाळी काम असल्याचे सांगितले होते. त्यासाठी ती सकाळी सहा-साडेसहाच्या सुमारास घर सोडणार असल्याचेही तिने त्याला सांगितले होते. त्यानंतर तिने त्याचा नंबर ब्लॉक केला होता. तेव्हा तो पहाटे साडेपाच वाजताच तिला भेटण्यासाठी आला होता. मात्र प्राची गेल्या महिन्याभरापासून त्याच्याकडे दुर्लक्ष करत होती आणि त्यांची शेवटची भेट १०-१२ दिवसांपूर्वी झाली होती, असा दावा गौरवने केल्याचे पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले.
जेव्हा प्राची घरातून निघाली, तेव्हा तिची आई शकुंतला मलिक झोपली होती. पालने प्राचीशी बोलण्याचा प्रयत्न केला. तसेच, त्याने तिला कामाच्या ठिकाणी सोडतो, असेही सांगितले. मात्र तिने त्याच्याशी बोलण्यास नकार दिला. त्यामुळे दोघांमध्ये खटके उडाले आणि तिने त्याच्या मुस्कटात मारली. त्याने तिचा फोन हिसकावण्याचा प्रयत्न केला. मात्र तिने चोर चोर असा आरडाओरडा केला. त्यानंतर प्राचीने टॅक्सी पकडली आणि पालही तिच्या सोबत बसला. तिथेही त्यांच्यात वाद सुरू होता. त्यानंतर त्याने घरातून आणलेल्या चाकूने तिच्यावर सपासप वार केले. त्याने हा चाकू त्याच्या पँटच्या खिशात ठेवला होता. प्राचीचा ओरडा ऐकल्यानंतर लोकांनी घटनास्थळी धाव घेतली. तोपर्यंत टॅक्सीचालकानेही पालला पकडले होते.
हे ही वाचा:
भारत- पाक सामना बघायला जाणाऱ्यांसाठी पश्चिम रेल्वेकडून विशेष ट्रेन
एलॉन मस्क यांचा हमासवर ‘हल्ला’
कर्नाळा बँक घोटाळा प्रकरणी माजी आमदार विवेक पाटील यांची दीडशे कोटींची मालमत्ता ईडीकडून जप्त
मद्यधुंद निवृत्त जवानाने राजधानी एक्स्प्रेसमध्ये झाडली गोळी
पोलिसांनाही तातडीने याबाबत कळवण्यात आले. त्यानंतर जमावाने त्याला पोलिसांच्या ताब्यात दिले. पाल हा गाझियाबादचा रहिवासी आहे. तिचा संपूर्ण चेहरा आणि डोके रक्ताने माखलेले होते आणि ती सगळ्यांकडे आपल्याला रुग्णालयात दाखल करा, असे आर्जव करत असल्याचे व्हिडीओत दिसते आहे. हा तरुण तिला त्रास देत असल्याची तक्रार तिने १० सप्टेंबरला पोलिसात केल्याचेही पोलिसांनी गितले. तेव्हा पोलिस घटनास्थळी पोहोचले होते. मात्र हे प्रकरण उसने पैसे घेतल्याच्या संदर्भात असल्याचे समजले होते. त्यानंतर तक्रारदाराला तूर्त त्या दिवशी कोणतीही कारवाई करायची नव्हती, असे उघड झाले आहे.
या तरुणीने नुकतेच तिचे पदवीचे शिक्षण पूर्ण केले होते. हा तरुण गेल्या दोन वर्षांपासून तिच्या मागे होता. तसेच, तो सारखा तिचा पाठलाग करत असे आणि तिला लग्नाची मागणी घालत असे. तो तिला काहीतरी दुखापत करेल, या भीतीने तिच्या कुटुंबीयांनी दोन महिन्यांपूर्वीच साकेत पोलिस ठाण्यात पोलिस तक्रारही दाखल केली होती.