कर्नाळा बँक घोटाळा प्रकरणी ईडीकडून शेतकरी कामगार पक्षाचे (शेकाप) नेते तसेच माजी आमदार विवेक पाटील यांची दीडशे कोटी रुपयांची स्थावर मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. यापूर्वी पाटील यांची २३४ कोटींची मालमत्ता जप्त केली होती. दोन्ही मिळून ईडीने आता पर्यत ३८६ कोटींची मालमत्ता या प्रकरणात जप्त केली आहे.
कर्नाळा बँक घोटाळ्यातून ही मालमत्ता खरेदी करण्यात आली होती अशी माहिती ईडीच्या सूत्रांनी दिली आहे.
अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) शेतकरी कामगार पक्षाचे चार वेळा आमदार राहिलेले आणि कर्नाळा नागरी सहकारी बँक लिमिटेड, पनवेलचे माजी अध्यक्ष विवेकानद शंकर पाटील, त्यांचे नातेवाईक आणि कर्नाळा महिला रेडीमेड गारमेंट्स को ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड यांच्या मालकीची दीडशे कोटींची स्थावर मालमत्ता गुरुवारी तात्पुरती जप्त केली आहे.
ईडीने २०१९ मध्ये मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने जवळपास ५०० कोटीच्या कर्नाळा बँक घोटाळा प्रकरणी दाखल केलेल्या गुन्ह्याच्या आधारे तपास सुरू केला होता. रिझर्व्ह बँकेच्या सांगण्यावरून २०१९-२० मध्ये ऑडिट करण्यात आल्यावर फसवणूक झाल्याचे उघडकीस आले होते.
विवेक पाटील हे कर्नाळा बँकेचे अध्यक्ष असताना काल्पनिक कर्ज खात्यांद्वारे बँकेतील निधी विवेकानंद एस पाटील यांच्या मालकीच्या/नियंत्रित संस्था/फर्म्स/ट्रस्टच्या कर्ज खात्यात टाकत होते. कर्नाळा चॅरिटेबल ट्रस्ट, कर्नाळा स्पोर्ट्स अकादमी, कर्नाळा महिला रेडीमेड गारमेंट्स कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड या संस्था पाटील यांच्या नियंत्रणाखाली आहे.
ईडीच्या तपासात फसवणूक झालेली रक्कम ५६० कोटी (अंदाजे) असून हा घोटाळा लपवण्यासाठी उपलब्ध निधी या काल्पनिक खात्यांमध्ये आणि या खात्यांमधून पाटील यांनी स्थापन केलेल्या संस्थांच्या अनेक बँक खात्यांमध्ये पाठवण्यात आला होता. या निधीचा वापर कर्नाळा चॅरिटेबल ट्रस्ट, कर्नाळा स्पोर्ट्स अकादमी इत्यादींनी क्रीडा संकुल, महाविद्यालय आणि शाळा यांसारख्या मालमत्तांच्या बांधकामासाठी आणि इतर वैयक्तिक फायद्यासाठी केला होता, त्याद्वारे गुन्ह्यातील उत्पन्नाचा वापर केला होता असे समोर आले.
हे ही वाचा:
इस्रायलच्या लष्कराने हमासच्या ताब्यातून केली २५० ओलिसांची सुटका
मद्यधुंद निवृत्त जवानाने राजधानी एक्स्प्रेसमध्ये झाडली गोळी
हमास दहशतवाद्यांचे नृशंस कृत्य; तान्ह्या मुलांची केली कत्तल
युनिव्हर्सल बॉसला मागे टाकल्याचा आनंद, पण बॉस तोच!
ईडीने विवेक पाटील यांना १५जून २०२१ रोजी अटक केली होती. सध्या ते न्यायालयीन कोठडीत आहेत. १२ ऑगस्ट २०२१ रोजी त्याच्या आणि बँकेविरुद्ध मनी लॉन्ड्रिंगच्या गुन्ह्यासाठी फिर्यादी तक्रार दाखल करण्यात आली आहे. १७ औगस्ट २०२१ रोजी एक तात्पुरती संलग्नता आदेश देखील यापूर्वी जारी करण्यात आला होता ज्यात विवेकानंद एस पाटील, त्यांच्या कुटुंबातील सदस्य आणि त्यांच्या संबंधितांची २३४ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली होती.
दरम्यान गुरुवारी या प्रकरणात ईडीने पुन्हा जवळपास दीडशे कोटी रुपयांची मालमत्ता तात्पुरती जप्त करण्यात आली आहे
ईडीने आतापर्यत विवेक पाटील यांची ३८६ कोटीची मालमत्ता ताब्यात घेऊन तात्पुरती जप्त केली आहे.