इस्रायलवर अचानक हल्ला करून हमासने अनेक नागरिकांना ओलिस ठेवले होते. त्यांची सुटका करण्यासाठी इस्रायल सातत्याने दबाव वाढवत आहे. तसेच, गाझा पट्टीवर सातत्याने बॉम्बवर्षाव केला जात आहे. या दरम्यान इस्रायलच्या सुरक्षा दलाने २५० ओलिसांची सुटका केली असल्याचा दावा केला जात आहे. इस्रायलच्या सुरक्षा दलाने ‘एक्स’वर ही माहिती दिली.
‘७ ऑक्टोबर रोजी सुफा लष्करी चौकीवर नियंत्रण मिळवण्याच्या संयुक्त प्रयत्नात फ्लोटिला १३ स्पेशल युनिटला गाझा पट्टीच्या जवळ तैनात करण्यात आले होते. या मध्ये जवानांनी सुमारे २५० जणांची सुखरूप सुटका केली आहे. या मोहिमेत ६०हून अधिक हमासच्या दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले. तर, २६ जणांना जिवंत पकडण्यात आले. पकडण्यात आलेल्या दहशतवाद्यांमध्ये हमासच्या दक्षिण विभागाचा उपकमांडर मोहम्मद अबू अली याचाही समावेश आहे,’ असे इस्रायलच्या सुरक्षा दलाकडून सांगण्यात आले.
हे ही वाचा:
‘हमासला पृथ्वीवरून नामशेष करू’!
मुंबई पोलीस दलात तीन हजार कंत्राटी पोलीस भरतीला सुरुवात!
खलिस्तानी समर्थक दहशतवाद्यांना घरी ठेवणाऱ्याला कॅनडाचा आश्रय
भारताचा जीडीपी ६.३ टक्के राहण्याची शक्यता
गाझाच्या उत्तरेकडील भागात जबालिया छावणी परिसरातील एका इमारतीवर इस्रायलने केलेल्या हवाई हल्ल्यात किमान ४५ पॅलिस्टिनी नागरिक मारले गेले आणि डझनभर जखमी झाले. जबालिया छावणीतील अल शिहाब याच्या घरावर दुपारी इस्रायलने हवाई हल्ला केला. या हल्ल्याप्रसंगी त्याचे घर त्याच्या नातेवाइकांनी तुडुंब भरले होते. त्याच्या कुटुंबातील काही सदस्यांनी गाझा पट्टीवर होणाऱ्या मोठ्या बॉम्बवर्षावामुळे येथे आश्रय घेतला होता. मात्र हवाई हल्ल्यात ते वाचू शकले नाहीत. हमासने इस्रायलवर हल्ला केल्यानंतर इस्रायलनेही गाझा पट्टीवरील आपल्या हल्ल्याची धार तीव्र केली आहे. त्यामुळे गाझा पट्टी परिसरात राहणारे अनेक नागरिक सुरक्षित आश्रयाच्या शोधात आहेत.