लष्कराच्या शीख रेजिमेंटच्या निवृत्त मद्यधुंद जवानाने गुरुवारी रात्री सियालदह राजधानी एक्स्प्रेसमध्ये गोळीबार केला. आरोपी हरपिंदर सिंग धनबादमधून रेल्वेच्या बी-८ डब्यामधून प्रवास करत होता. ट्रेन मतारी स्थानकावरून जात होती. त्याच दरम्यान त्याच्या परवानाधारक रिव्हॉल्व्हरमधून गोळी झाडली गेली. त्यामुळे रेल्वे डब्यामध्ये एकच गोंधळ उडाला. हा निवृत्त जवान एका कंपनीत सुरक्षारक्षक म्हणून काम करत होता.
रेल्वेमधील जवानांनी त्याला ताब्यात घेऊन त्याबाबतची माहिती तत्काळ सुरक्षा नियंत्रण कक्षाला दिली. त्यानंतर राजधानी एक्स्प्रेस कोडरमा स्थानकावर थांबवण्यात आली आणि आरोपी जवानाला रेल्वे पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. त्याची अद्याप चौकशी सुरू आहे. बी-८ बोगीच्या शौचालयावरून एक खोका हस्तगत करण्यात आला आहे.
जवानाच्या दाव्यानुसार, गोळी चुकून झाडली गेली. हा जवान २०१९ मध्ये निवृत्त झाला असून त्याची वैद्यकीय तपासणी करण्यासाठी त्याला रुग्णालयात आणण्यात आले आहे. त्यानंतर त्याला धनबादला नेले जाईल. धनबाद रेल्वे पोलिस ठाण्यात त्याच्या विरोधात आर्म्स ऍक्टनुसार गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
हे ही वाचा:
भारतातील इस्रायली नागरीक चिंतेत!
२०२४ साठी काँग्रेसचे फोडा आणि सत्ता ओढा धोरण…
शतकवीर रोहितमुळे भारताकडून अफगाणिस्तान स्वस्तात पराभूत
नॉर्थ ईस्ट एक्स्प्रेसचे २१ डबे घसरले; पाच ठार, ८० जखमी
आरपीएफला त्याच्या जवळ पिस्तुलासह नवी दिल्लीचे एक रिझर्व्हेशन तिकीटही मिळाले आहे. त्याचे रिझर्व्हेशन हावडा राजधानी एक्स्प्रेसमध्ये होते, मात्र तो मद्यधुंद असल्याने तो हावडा राजधानीच्या ऐवजी २० मिनिटांनंतर सुटणाऱ्या धनबादला येणाऱ्या सियालदह एक्स्प्रेसमध्ये चढला होता. जागा नसल्याने तो डब्यातील शौचालयाजवळ उभा होता. त्याच दरम्यान अडखळून त्याचा तोल गेला आणि त्याची पिस्तुल जमिनीवर पडली. त्यामुळे त्यातून गोळी झाडली गेली असावी, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. यात कोणीही जखमी झालेले नाही. मात्र आरपीएफ आणि रेल्वे पोलिस त्याच्या पिस्तुल परवान्याचाही तपास करणार आहेत.