दिल्लीत आम आदमी पक्षाचे नेते ईडीच्या रडारवर असून या नेत्यांविरोधात ईडीची कारवाई सुरूच आहे. मंगळवार. १० ऑक्टोबर रोजी ईडीचे पथक आप आमदार अमानतुल्ला खान यांच्या घरावर छापा टाकण्यासाठी ओखला येथे दाखल झाले आहे.
माहितीनुसार, सकाळी ६.३० वाजता ईडीचे पथक आमदार अमानतुल्ला खान यांच्या घराजवळ पोहोचली आणि सुमारे ७.३० वाजता अंमलबजावणी संचालनालयाचे पथक अमानतुल्ला खान यांच्या घरात घुसले. मीडिया रिपोर्टनुसार, ईडीने गेल्या वर्षी अमानतुल्ला खान यांच्याविरोधात वक्फ बोर्ड जमीन घोटाळ्याच्या आधारे कारवाई करत हा छापा टाकला आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागानेही (एसीबी) अमानतुल्ला यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. गेल्या वर्षी एसीबीने दिल्लीतील त्यांच्या संबंधित पाच ठिकाणी छापे टाकले होते. या छाप्यात १२ लाख रुपये रोख, एक विनापरवाना बेरेटा पिस्तूल आणि दोन वेगवेगळ्या बोअरची काडतुसे जप्त करण्यात आली होती.
काही दिवसांपूर्वी ईडीने आम आदमी पक्षाचे खासदार संजय सिंह यांच्या घरी देखील छापे टाकले होते. येथे धेखील ईडीने काही दस्तावेज जप्त केले होते. दिल्ली मद्य धोरण घोटाळा प्रकरणात संजय सिंह यांच्या ठिकाणांवर हे छापे टाकण्यात आले होते. ईडीने तब्बल आठ तास छापेमारी केली होती. दिल्लीतील मद्यघोटाळ्याप्रकरणी दाखल आरोपपत्रात सिंह यांचे नाव नमूद करण्यात आले आहे.
हे ही वाचा:
जे.जे.रुग्णालयात १५ वर्षीय रुग्ण मुलीचा विनयभंग
इस्रायलमधून नवऱ्याशी बोलताना अचानक कॉल कट आणि….
घर चालवल्याप्रमाणे शरद पवार पक्ष चालवत होते!
ब्लॉगरचा दावा; चिनी एजंट्ने केली हरदीपसिंग निज्जरची हत्या
मद्यधोरण प्रकरणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करून या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची शिफारस दिल्लीचे नायब राज्यपाल व्ही. के. सक्सेना यांनी केली होती. त्यानंतर हे मद्यधोरण रद्द करण्यात आले होते. दिल्ली सरकारच्या सन २०२१-२२च्या मद्य धोरणात परवान्यासाठी लाच देणाऱ्या काही विक्रेत्यांना अनुकूल निर्णय दिल्याचा आरोप सीबीआय आणि ईडीने केला आहे.