केंद्रीय निवडणूक आयोगाने पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या आहेत. निवडणूक आयोगाच्या सोमवार, ९ ऑक्टोबर रोजी झालेल्या पत्रकार परिषदेत याबाबत माहिती देण्यात आली. मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, तेलंगणा आणि मिझोराम या पाच राज्यांमध्ये निवडणुकींचा रणसंग्राम रंगणार आहे. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार, निवडणूक आयुक्त अनूप चंद्र पांडेय, अरुण गोयल यांनी पत्रकार परिषद घेऊन तारखा जाहीर केल्या.
निवडणूक आयोगाच्या घोषणेनुसार मिझोराममध्ये ७ नोव्हेंबरला मतदान होणार आहे. छत्तीसगडमध्ये दोन टप्प्यात मतदान होणार असून छत्तीसगडमध्ये ७ नोव्हेंबर आणि १७ नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. मध्यप्रदेशातही १७ नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. तेलंगणात ३० नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. तर २३ नोव्हेंबर रोजी राजस्थानमध्ये मतदान होणार आहे.
या पाच राज्यात विधानसभेच्या ६७९ जागा आहेत. या पाचही राज्यात १६.१४ कोटी मतदार आहेत. यात ८.२ कोटी पुरुष, ७.८ कोटी महिला आणि ६०.२ लाख नवोदित मतदार आहेत, असं राजीव कुमार यांनी स्पष्ट केले आहे. पाच राज्यात महिला मतदारांची संख्या वाढली आहे. तसेच अपंग मतदार, ज्येष्ठ नागरिक आदींना घरून मतदान करण्याची सुविधा देण्यात आल्याचंही आयोगानं स्पष्ट केलं आहे.
हे ही वाचा:
हमास दहशतवाद्यांच्याच्या नौदल कमांडरला इस्त्रायल सैन्याने घेतले ताब्यात
तेलंगणामध्ये मृतावस्थेत आढळली १०० माकडे!
जर श्री रामजन्मभूमी परत घेता आली तर आम्ही ‘सिंधूही’ परत आणू!
दिल्ली दंगलीत पोलिसांवर पिस्तुल रोखणाऱ्या शाहरुखला जामीन; तरीही तुरुंगातच
सर्व राज्यांचे निवडणुकीचे निकाल ३ डिसेंबरला लागणार असून पाच राज्यातील विधानसभेच्या निवडणुका या लोकसभा निवडणुकीआधीच्या सेमीफायनल मानल्या जात आहे. पाच राज्यांच्या निकालामध्ये मतदार कोणाला संधी देईल, यावर लोकसभेतील चित्र स्पष्ट होईल असं बोललं जात आहे. त्यामुळे पाच राज्यातील निवडणुका महत्त्वाच्या मानल्या जात आहेत.
- मध्य प्रदेश
मतदान- १७ नोव्हेंबर
निकाल- ३ डिसेंबर
- राजस्थान
मतदान- २३ नोव्हेंबर
निकाल- ३ डिसेंबर
- छत्तीसगड
मतदान- ७ आणि १७ नोव्हेंबर
निकाल- ३ डिसेंबर
- तेलंगाणा
मतदान- ३० नोव्हेंबर
निकाल- ३ डिसेंबर
- मिझोराम
मतदान- ७ नोव्हेंबर
निकाल- ३ डिसेंबर