तीन वर्षांपूर्वी महाविकास आघाडीचा प्रयोग करून वाहवा मिळविणाऱ्या आणि त्यासाठी मुख्यमंत्रीपदाची माळ उद्धव ठाकरे यांच्या गळ्यात घालणाऱ्या शरद पवारांची वाटचाल आता उद्धव ठाकरे यांच्याच दिशेने होत आहे. सोमवारी सर्वोच्च न्यायालयात शरद पवार गटाच्या वतीने अजित पवार यांच्यासोबत असलेल्या आमदारांना अपात्र करण्यासाठी सुनावणी होत आहे. जयंत पाटील यांनी ही याचिका केली आहे.
शरद पवार यांनी उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री केल्यानंतर महाराष्ट्रातील राजकारण बदलले. त्यानंतर उद्धव ठाकरे यांचा पक्ष फुटला, त्यांचे चिन्ह गेले, नावही त्यांनी गमावले. मग विधानसभा अध्यक्षांकडे आमदारांच्या अपात्रतेचा मुद्दा आला त्याचसंदर्भात उद्धव ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावले. अगदी तशीच वेळ शरद पवार यांच्यावरही आलेली आहे.
शरद पवार यांच्या गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सर्वोच्च न्यायालयात अजित पवार यांच्या आमदारांना अपात्र करण्यासाठी याचिका दाखल केली आहे. अजित पवार यांच्यासोबत ४१ आमदार आहेत. ते सगळे अपात्र करावेत, कारण त्यांनी पक्षशिस्त मोडली आहे, असे म्हणत ही याचिका करण्यात आली आहे. त्याच याचिकेवर सोमवारी सुनावणी होत आहे. आता या सुनावणीत दोन्ही गटाकडून कोणते युक्तिवाद केले जातात हे पाहायचे आहे.
हे ही वाचा:
तेलंगणामध्ये मृतावस्थेत आढळली १०० माकडे!
जर श्री रामजन्मभूमी परत घेता आली तर आम्ही ‘सिंधूही’ परत आणू!
दिल्ली दंगलीत पोलिसांवर पिस्तुल रोखणाऱ्या शाहरुखला जामीन; तरीही तुरुंगातच
‘इस्रो’वर दररोज होतात १०० सायबरहल्ले
शरद पवार आणि अजित पवार हे गट निवडणूक आयोगासमोरही आमनेसामने आहेत. पक्ष आणि चिन्ह आपलेच आहे असे दावे दोन्ही गटांकडून करण्यात आले आहेत. सोमवारी सकाळी ११ वाजता या याचिकेवर सुनावणी होणार आहे. सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी होईल. राष्ट्रवादीच्या वतीने या याचिकेत काही मुद्द्यांवर लक्ष वेधण्यात आले आहे. पक्षाच्या विरोधात ९ आमदारांनी शपथ घेतल्याचे त्यात म्हटले आहे. पक्षाची मान्यता या आमदारांना नव्हती तरीही त्यांनी शपथ घेतली आहे. त्यामुळे या मंत्र्यांवर कारवाई व्हावी अशी मागणी करण्यात आली आहे. त्यासाठी केशम सिंग आणि राजेंद्र सिंग राणा या खटल्यांचे दाखलेही देण्यात आले आहेत.
विधानसभा अध्यक्षांकडेही हे प्रकरण कधी येईल अशी विचारणा शरद पवार गटाकडून केली जात आहे. सर्वोच्च न्यायालय आता या याचिकेवर कधी निर्णय देणार हा प्रश्न आहे. विधानसभा अध्यक्षांकडे हे प्रकरण उद्धव ठाकरेंप्रमाणेच सोपविण्यात येईल का, याचीही चर्चा आहे. उद्धव ठाकरेंना ज्या पद्धतीने या सगळ्या बदललेल्या परिस्थितीचा सामना करावा लागला तशीच परिस्थिती शरद पवार यांच्याबाबतीतही आहे, हा योगायोग इथे दिसत आहे.