महाराष्ट्रात २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याची आयडिया ही शरद पवरांचीच होती, असा गौप्यस्फोट राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका कार्यक्रमात बोलताना केला. २०१९ मध्ये शिवसेनेने भाजपाला सत्ता स्थापनावेळी धोका दिला होता. त्यानंतर त्यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीशी चर्चा सुरू केली होती. उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री व्हायचं असल्याचं लक्षात आलं. त्यानंतर राष्ट्रवादीच्या काही नेत्यांनी भाजपाकडे युतीचा प्रस्ताव ठेवला होता. तीन पक्षाचे सरकार नको भाजपासोबत आम्हाला तीन पक्षाचं सरकार नकोय. आम्ही तुमच्यासोबत येऊ शकतो, असा हा प्रस्ताव होता, असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘इंडिया टुडे’ कॉन्क्लेव्हसाठी दिलेल्या मुलाखतीत बोलताना २०१९ च्या सत्तानाट्याबाबत खळबळजनक खुलासा केला. २०१९ मध्ये राज्यात राष्ट्रपती राजवटीची कल्पना शरद पवार यांचीच होती. २०१९ मध्ये शिवसेनेनं भाजपाचा विश्वासघात करून काँग्रेस-राष्ट्रवादीशी बोलणी सुरू केली, तेव्हा उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री करण्याबाबत हालचाली सुरू असल्याचं कानावर आलं. त्यावेळी राष्ट्रवादीच्या काही नेत्यांनी भाजपासोबत येण्याची तयारी दाखवली होती. त्यानंतर शरद पवार यांच्यासोबत बैठक झाली. त्यावेळी त्यांनी भाजपासोबत येणार असल्याचे सांगितले. दोन्ही पक्ष एकत्र आणण्याची जबाबदारी माझ्यावर आणि अजित पवार यांच्यावर टाकण्यात आली.
आमदार, मंत्र्यांचे पोर्टफोलिओ तयार केले. जिल्ह्यांपासूनच्या सर्व गोष्टी ठरवल्या. या प्रक्रियेच्या काळातच महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याचं ठरलं. त्यानुसार राष्ट्रपती राजवट लागू केली. पण, त्यानंतर शरद पवार यांनी त्यांचा निर्णय बदलला. हे योग्य नसल्याचं अजित पवार यांना वाटलं. त्यामुळे त्यांनी भाजपसोबत येण्याचा निर्णय घेतला होता, असं फडणवीस म्हणाले. २०१९ मध्ये जी डील झाली होती. ती अजित पवार यांच्यासोबत झाली नव्हती. तर ती शरद पवार यांच्यासोबत झाली होती. शरद पवार यांच्यासोबत चर्चा करूनच निर्णय घेण्यात आला होता. त्यांनी संमती दिल्यानंतरच आम्ही अजित पवार यांच्यासोबत चर्चा करायला बसलो, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
हे ही वाचा:
सिक्कीममध्ये ढगफुटी; महापुरात लष्कराचे २३ जवान बेपत्ता
इटलीमध्ये पर्यटकांची बस उलटून २१ ठार
मुंबईमधील स्विमिंग पूलमध्ये शिरली मगर
देवेंद्र फडणवीस यांनी यापूर्वीही अनेकदा राजकारणाच्या पटलावरील गौप्यस्फोट करत शरद पवारांची दुहेरी भूमिका उघडकीस आणण्याचा प्रयत्न केला आहे. आता केलेल्या गौप्यस्फोटानंतर राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या आहेत.