युरोपियन देश असलेल्या इटलीमध्ये भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. पर्यटकांना घेऊन जाणाऱ्या बसचा भीषण अपघात झाला आहे. या दुर्दैवी अपघातात २१ जणांचा मृत्यू झाला तर १८ जण जखमी झाले आहेत. इटलीतील व्हेनिस शहरात ही घटना घडली आहे. मृतांमध्ये बस चालकाचादेखील समावेश आहे.
इटलीतील व्हेनिस शहरात पर्यटनासाठी आलेल्या पर्यटकांच्या बसला हा अपघात झाला. ही बस व्हेनिसच्या ऐतिहासिक केंद्रातून कॅम्पिंग साईटवर परतत होती. यावेळी संध्याकाळी ७.३० च्या सुमारास हा अपघात झाला. या बसमध्ये ४० प्रवासी होते. . त्यापैकी २१ जणांचा मृत्यू झाला आहे, तर १८ जण जखमी झाले आहेत. जखमींना जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले असून चार जणांची प्रकृती गंभीर आहे. त्यामुळे मृतांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त होत आहे.
व्हेनिसचे महापौर लुइगी ब्रुगनारो यांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी संध्याकाळी व्हेनिसच्या मेस्त्रे येथे एक बस उलटली आणि रस्त्याच्या कडेला असलेल्या भागात कोसळली. रेल्वे रुळाजवळ पडलेल्या या अपघातग्रस्त बसने लगेच पेट घेतला. या दुर्घटनेत २१ जणांचा मृत्यू झाला, तर १५ जणांना वाचविण्यात यश आले. पोलिसांच्या मदतीने बचाव पथकाने ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांना बाहेर काढले आहे. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले आहे.
मृतांमध्ये युक्रेनियन पर्यटकांचा समावेश आहे तर इटालियन न्यूज एजन्सी एएनएसएच्या माहितीनुसार, मृतांमध्ये जर्मन आणि फ्रेंच नागरिकांचा समावेश आहे. जखमींमध्ये तीन युक्रेनियन, एक क्रोएशियन, जर्मन आणि फ्रेंच नागरिक आहेत. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, अपघाताचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. घटनेचा तपास सुरू असल्याचे सांगण्यात आले आहे.
हे ही वाचा:
मुंबईमधील स्विमिंग पूलमध्ये शिरली मगर
नांदेड मधील रुग्णांच्या मृत्यूसाठी जबाबदार असलेल्यांवर कठोर कारवाई होईल!
बांगलादेशात नऊ महिन्यात डेंग्यूने घेतेले १ हजारहून अधिक बळी
महापौर ब्रुगनारो यांनी ट्विट करत शोक व्यक्त केला आहे. अपघात भयंकर होता. याबाबत काही सांगता येणार नाही. त्याच वेळी, युरोपियन युनियनच्या अध्यक्षा उर्सुला वॉन डेर लेन यांनी देखील मृतांबद्दल शोक व्यक्त केला आहे. त्यांनी ट्विट करत, दुर्घटनेत प्राण गमावलेल्यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले आहे. त्याचबरोबर पीडितांच्या कुटुंबियांप्रती संवेदना व्यक्त केल्या आहेत.