पूर्व उपनगरातील गोवंडी परिसरात बेकायदेशीररित्या चालवल्या जाणाऱ्या नर्सिंग होम मधून नवजात अर्भकाची विक्री होत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. ५ ते ८ लाख रुपयांपर्यंत या मुलांची विक्री करणाऱ्या महिलांच्या टोळीला ट्रॉम्बे पोलिसांनी अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या महिलांमध्ये बोगस डॉक्टर, एजंट यांचा समावेश आहे.
गोरीबी उस्मान शेख, शबाना झाकीर शेख, गुलाबशा मतीन शेख, ज्युलीया लॉरेन्स फर्नाडीस, सायराबानो नबीउल्ला शेख व रिना नितीन चव्हाण असे अटक करण्यात आलेल्या महिलांची नावे आहेत. सायराबानो ही बोगस डॉक्टर असून गोवंडीतील रफिक नगर मध्ये रहेमानी नावाचे बेकायदेशीर नर्सिंग होम चालवत होती. ज्युलियो ही या सर्वांची प्रमुख असून ती एजंट महिला आणि डोनर महिलांच्या आणि संपर्कात होती तसेच मुलांची किंमत ठरवण्याचे काम ज्युलियो ही महिला करीत होती.
ट्रॉम्बे पोलीस ठाण्याचे गुन्हा प्रकटीकरण पथकाचे पोलीस उपनिरीक्षक शरद नाणेकर यांना गुप्त माहितीदाराने दिलेल्या माहिती नुसार गोवंडीच्या एका नर्सिंग होम मध्ये एका नवजात अर्भकाची पाच लाख रुपयात विक्री होणार आहे, या माहितीच्या आधारे परिमंडळ ६ चे पोलीस उपायुक्त हेमराजसिंह राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली वपोनि. रविंद्र रणशेवरे, पोनि फरीद खान (गुन्हे) व पोउनि शरद नाणेकर, विजयसिंह देशमुख, अनिल बांगर, अजय गोल्हार, अमर चेडे, सुरज खेतल, पूजा सलादे व गुन्हे प्रकटीकरण पथकाने गोवंडीच्या रफिक नगर मधील रहिमानी नर्सिंग होम या ठिकाणी छापा टाकून बेकायदेशीररित्या नवजात अर्भकाची होणारी विक्री थांबवून बोगस डॉक्टर सायरबानो सह पाच महिलांना अटक करण्यात आली.
या महिलांच्या ताब्यातून नवजात अर्भकाची सुटका करण्यात आली आहे,या पुरुष जातीच्या नवजात अर्भकाची ५ लाख रुपयात विक्री करण्यात येणार होती अशी माहिती समोर आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ही टोळी मुले विक्री करण्याचे एक मोठे रॅकेट चालवत होते. फुटपाथवर राहणाऱ्या तसेच गरीब गर्भवती महिलाना पैशांचे आमिष दाखवून त्यांना जन्माला येणारे मुलाची विक्री करण्या साठी तयार करण्यात येत होती. त्यानंतर या गर्भवती महिलेला रहिमानी नर्सिंग होम मध्ये आणून त्यांची डिलिव्हरी करून त्या मुलांची विक्री मुले न होणाऱ्या श्रीमंत घरातील दाम्पत्यांना ५ ते ८ लाख रुपयांना त्यांची बेकायदेशीर विक्री करण्यात येत होती.
अर्भकामध्ये मुलींची मागणी अधिक असल्यामुळे स्त्री जातीचे अर्भकाची ७ ते ८ लाख रुपयात विक्री होत होती तर पुरुष जातीचे अर्भक ४ ते ५ लाख रुपयात करण्यात येत होती.
हे ही वाचा:
मुंबईमधील स्विमिंग पूलमध्ये शिरली मगर
नांदेड मधील रुग्णांच्या मृत्यूसाठी जबाबदार असलेल्यांवर कठोर कारवाई होईल!
बांगलादेशात नऊ महिन्यात डेंग्यूने घेतेले १ हजारहून अधिक बळी
अटक करण्यात आलेल्या बोगस डॉक्टर सायराबानो नबीउल्ला शेख आणि ज्युलीया लॉरेन्स फर्नांडीस हे सराईत असून त्यांचेवर यापुर्वी अशाच प्रकारचे ०६ गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसानी दिली आहे. सायराबानो हिचे शिक्षण दहावी पर्यत झाले असून ती रेहमानी नावाचे नर्सिंग होम चालवून स्वतःला डॉक्टर असल्याचे भासवत होती अशी माहिती पोलिसांनी दिली.