28 C
Mumbai
Sunday, November 24, 2024
घरराजकारणमोदी कडाडले; विरोधकांकडून जातीपातीच्या आधारावर समाजाची विभागणी

मोदी कडाडले; विरोधकांकडून जातीपातीच्या आधारावर समाजाची विभागणी

बिहारने केलेल्या जातिनिहाय जनगणनेनंतर केले वक्तव्य

Google News Follow

Related

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी काँग्रेसचे नाव न घेता विरोधी पक्षांवर जोरदार हल्ला चढवला. ‘विरोधी पक्षांनी गरिबांच्या भावनांशी खेळ करून सहा दशकांपासून देशाची जातीपातीच्या आधारे विभागणी केली आहे. हे पाप ते आतासुद्धा करत आहेत,’ असा घणाघाती आरोप मोदी यांनी केला. बिहारमधील नितीश कुमार सरकारने सन २०२४च्या लोकसभा निवडणुकीच्या काही महिन्यांपूर्वी जात सर्वेक्षणाचे निष्कर्ष जाहीर केल्यानंतर काही तासांतच मोदी यांनी हे वक्तव्य केले आहे. बिहारमध्ये ओबीसी आणि आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीयांचे प्रमाण हे राज्याच्या एकूण लोकसंख्येच्या ६३ टक्के असल्याचे आढळले आहे.

 

 

काँग्रेस हा बिहारमधील सत्ताधारी गटाचा घटक आहे आणि केंद्रात सत्तेवर आल्यास देशात जात-आधारित जनगणना करण्याचे आश्वासन काँग्रेसने दिले आहे. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी दोन दिवसांपूर्वी मध्य प्रदेशातील शाजापूर जिल्ह्यात एका सभेला संबोधित करताना, त्यांचा पक्ष केंद्रात सत्तेवर आल्यास समाजातील सर्व घटकांना, विशेषत: इतर मागासवर्गीयांच्या लाभासाठी देशात जात-आधारित जनगणना केली जाईल, असे आश्वासन दिले होते. या विधानाचाही मोदी यांनी समाचार घेतला.

 

‘विकासाच्या शत्रूंना केंद्रात राज्य करण्यासाठी सहा दशके म्हणजे ६० वर्षे मिळाली. मात्र चांगले काही करून दाखवण्यात ते अपयशी ठरले. परंतु नऊ वर्षांत केंद्रात भाजपच्या राजवटीत देशाचा प्रचंड विकास झाला आणि जग भारताचे गुणगान गात आहे. केवळ नऊ वर्षांत इतके काम होऊ शकते, तर ६० वर्षांत ते का होऊ शकले नाही?’ असा सवाल मोदींनी काँग्रेसचे नाव न घेता केला.

 

 

१९ हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक किमतीच्या विकास प्रकल्पांची पायाभरणी आणि उद्घाटन केल्यानंतर ग्वाल्हेरमध्ये ते एका कार्यक्रमाला संबोधित करत होते. मध्य प्रदेशात लवकरच विधानसभा निवडणुका होणार आहेत. ‘एका दिवसात १९ हजार कोटींहून अधिक रुपयांचे हे प्रकल्प दुहेरी इंजिन सरकारचे परिणाम आहेत,’ असे ते म्हणाले. राज्यात आणि केंद्रातही सत्तेत असलेल्या भाजपचा संदर्भ त्यांनी दिला.

 

 

‘ते गरीब आणि जातीच्या आधारावर विभागलेल्या समाजाच्या भावनांशी खेळले. हे पाप ते आताही करत आहेत. आजकाल जागतिक व्यासपीठांवर देशाचे कौतुक होत आहे, हे भाजपविरोधी पक्षांना आवडत नाही,’ असे विधान करत त्यांनी विरोधी पक्षांवर शरसंधान केले. ‘जेव्हा संपूर्ण जग देशाची स्तुती करत आहे आणि भारतात आपले भविष्य पाहात आहेत, तेव्हा असे लोक आहेत जे राजकारणात गुंतले आहेत आणि त्यांना आपल्या खुर्चीशिवाय काहीही दिसत नाही. त्यांना जगभर भारताचे कौतुक केलेले आवडत नाही. हे विकासविरोधी आहेत. देशात काहीही घडले नाही, हे सिद्ध करण्याचा ते प्रयत्न करत आहेत. भारताची स्तुती झाली की त्यांच्या पोटात दुखते,’ असेही मोदी म्हणाले.

 

 

‘त्यांच्या मनात केवळ एकच गोष्ट आहे – देश आणि त्याच्या धोरणांबद्दल द्वेष. या द्वेषात मग त्यांना देशाच्या कामगिरीचेही विस्मरण होते,’ असेही पंतप्रधान म्हणाले. मोदींनी विरोधी पक्षांवर ‘विकासविरोधी’ असल्याचा आरोप केला. ‘देशात होत असलेल्या विकासाचे ते विरोधक आहेत. ते विकासाचा द्वेष करणारे आहेत.’ आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताच्या वाढत्या दबदब्याचाही पंतप्रधानांनी संदर्भ दिला. देश आता जगातील पाचव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनला आहे आणि आम्हाला आपल्या देशाला तिसऱ्या क्रमांकावर न्यायचे आहे, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
196,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा