चीनमध्ये आशियाई क्रीडा स्पर्धा २०२३ सुरू असून भारतीय खेळाडूंकडून पदकांची लयलूट सुरू आहे. अशातच भारतीय क्रिकेट संघानेही दमदार कामगिरी करत उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. उप उपांत्य सामन्यात भारताने नेपाळचा २३ धावांनी पराभव केला. भारताकडून युवा खेळाडू यशस्वी जयस्वाल याने शतकी खेळी केली. तर, गोलंदाजीत रवि बिश्नोई याने तीन विकेट्स घेतल्या.
या सामन्यात भारतीय संघाने ऋतुराज गायकवाड याच्या नेतृत्वाखाली प्रथम फंलदाजी करताना २० षटकात चार फलंदाजांच्या मोबदल्यात २०२ धावांचा टप्पा गाठला. फलंदाजी करताना यशस्वी जयस्वाल याने ४९ चेंडूंमध्ये ८ चौकार आणि ७ षटकारांच्या जोरावर शतकी खेळी केली. तर रिंकू सिंग याने १५ चेंडूत २ चौकार आणि ४ षटकारांच्या जोरावर नाबाद ३७ धावा केल्या. तर कर्णधार ऋतुराज गायकवाड याने २५ धावा केल्या आणि शिवम दुबे याने नाबाद २५ धावांची खेळी केली. तिलक वर्मा (२ धावा) आणि जितेश शर्मा (५ धावा) यांना छाप पाडता आलेली नाही. नेपाळकडून डी. एस. ऐरी याने ३१ धावा देत दोन विकेट्स घेतल्या तर एस. कानी आणि एस. लमीछाने यांनी प्रत्येकी एक एक विकेट घेतली.
भारताने दिलेल्या २०३ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना नेपाळने सावध सुरुवात केली. नेपाळने १० षटकात तीन फलंदाजांच्या मोबदल्यात ७६ धावांपर्यंत मजल मारली होती. त्यानंतर भारताच्या फिरकी गोलंदाजांसमोर नेपाळचे फलंदाज ढेपाळले. एकापाठोपाठ एक ठराविक अंतराने खेळाडूंनी विकेट्स घेतल्या. नेपाळकडून सलामी फलंदाज कौशल याने ३२ चेंडूत १ षटकार आणि ४ चौकारांच्या मदतीने २८ धावा जोडल्या. आसिस शेख हा १० धावा करून तंबूत परतला. तर, कौशल मल्ला याने २२ चेंडूत २ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने २९ धावा केल्या. कर्णधार रोहित पी अवघ्या तीन धावा काढून परतला. डी. एस. ऐरी आणि एस. जोरा यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला मात्र, त्यांना यश आले नाही.
हे ही वाचा:
नांदेडमधील ३१ तर छ. संभाजीनगरमधील शासकीय रुग्णालयात १० रुग्णांचा मृत्यू
कनोइंग स्पर्धेत भारताच्या अर्जुन सिंह, सुनिल सिंह यांची कांस्य पदकाची कमाई
चिनी फंडींग प्रकरणी ‘न्यूज क्लिक’मधील पत्रकारांच्या घरांवर छापेमारी
घुस के मारणारा अज्ञातांचा वॅगनर ग्रुप…
भारताकडून रवि बिश्नोई याने ४ षटकात २४ धावांच्या मोबदल्यात तीन विकेट्स घेतल्या. अर्शदीप सिंह आणि आवेश खान यांनी प्रत्येकी दोन दोन विकेट घेतल्या. साई किशोर याने एक विकेट घेतली.