टेस्ला कंपनीचे सहसंस्थापक, स्पेसएक्सचे संस्थापक आणि सीईओ एलॉन मस्क यांनी कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडले आहे. तसेच, त्यांच्यावर अभिव्यक्ती स्वातंत्र्य पायदळी तुडवल्याचा आरोप केला आहे. कॅनडाने नुकतेच ऑनलाइन स्ट्रिमिंग सेवांसाठी नवे नियम बनवले आहेत. या नियमानुसार, ऑनलाइन स्ट्रिमिंग सेवा देणाऱ्या कंपन्यांना सरकारच्या ‘नियामक नियंत्रण’ प्राधिकरणाकडून परवानगी घेण्यासाठी त्यांना औपचारिकरित्या नोंद करणे बंधनकारक करण्यात आले आहे.
पत्रकार आणि लेखक ग्लेन ग्रीनवॉल्ड यांनी कॅनडाच्या या नव्या नियमाबाबत ‘एक्स’वर मत व्यक्त केले होते. त्यावरून मस्क यांनी ही टीका केली आहे. ‘जगभरातील सर्वांत हुकूमशाही करणाऱ्या ऑनलाइन सेन्सॉरशिप योजनांपैकी एक असणाऱ्या कॅनडाने घोषणा केली आहे की, पॉडकास्ट सादर करणाऱ्या सर्व ऑनलाइन स्ट्रिमिंग सेवा देणाऱ्या कंपन्यांना नियामक नियंत्रण प्राधिकरणाकडून परवानगी घेण्यासाठी सरकारकडून अधिकृत नोंद करवून घ्यावी लागेल,’ अशी पोस्ट ग्रीनवॉल्ड यांनी केली होती. यावर मस्क यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. ‘ट्रुडो हे कॅनडातील नागरिकांचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य पायदळी तुडवण्याचा प्रयत्न करत आहेत, जी अतिशय लाजिरवाणी बाब आहे,’ अशी तिखट प्रतिक्रिया मस्क यांनी दिली आहे.
हे ही वाचा:
ते जर्मनीच्या अध्यक्षांचे निवासस्थान, बोर्डिंग स्कूल नव्हे!
तजिंदरपालसिंगने केली सुवर्णविजेती गोळाफेक!
याआधीही ट्रुडो यांच्यावर नागरिकांचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य पायदळी तुडवल्याचा आरोप करण्यात आला आहे. फेब्रुवारी, २०२२मध्ये ट्रुडो यांनी देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच आपत्कालीन परिस्थितीत सरकारकडून वापरल्या जाणाऱ्या अतिरिक्त अधिकारांचा वापर केला होता. सरकारच्या करोना प्रतिबंधांविरोधात निदर्शने करणाऱ्या ट्रकचालकांना रोखण्यासाठी त्यांनी अतिरिक्त अधिकारांचा वापर करण्याचे निर्देश दिले होते. हे चालक तेव्हा लशीसंदर्भातील सरकारच्या आदेशाविरोधात निदर्शने करत होते.