राजस्थानच्या पाली जिल्ह्यातील एका खासगी शाळेत शिकणाऱ्या चार वर्षीय दलित विद्यार्थिनीवर तेथील शिक्षकाने बलात्कार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. मात्र शाळा प्रशासन या शिक्षकाचा बचाव करत असल्याचा आरोप करून संतप्त ग्रामस्थांनी या शाळेची नासधूस केली.
बलात्काराची घटना उघडकीस येताच, पीडित विद्यार्थिनीच्या कुटुंबांनी लगेचच शाळेच्या प्राचार्यांना कळवले होते. मात्र शाळा प्रशासनाने याबाबत तातडीने पावले उचलून योग्य ती कारवाई केली नाही, असा दावा पीडितेच्या कुटुंबाने केला आहे. या २३ वर्षीय आरोपी शिक्षकाचे नाव रवी वगोरिया असे आहे. शाळा प्रशासन या आरोपीचा बचाव करत असल्याचा आरोप करून संतप्त गावकऱ्यांनी शाळेवर धडक दिली.
२२ सप्टेंबर रोजी या शिक्षकाने मुलीवर बलात्कार केला. ‘मी जेव्हा माझ्या मुलीला शाळेतून घरी घेऊन जात होते. तेव्हा तिला रक्तस्राव होत होता. मी तातडीने याबाबत मुख्याध्यापकांना कळवले. तेव्हा त्यांनी काहीतरी टोकदार वस्तू तिला लागली असावी, असे सांगितले,’ अशी माहिती पीडित मुलीच्या आईने दिली. या घटनेनंतर संतप्त ग्रामस्थांनी शाळेला घेराव घालून शाळेच्या आवाराची नासधूस केली. शाळेचे फर्निचर फेकून देण्यात आले. शाळेच्या मॅनेजरवर हल्ला केला. त्यामुळे त्याला जवळच्या घरात आश्रय घ्यावा लागला.
हे ही वाचा:
कोकण रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले, संतप्त प्रवाशांचा दिवा स्थानकात रेल रोको
भारतातील अफगाण दूतावासाने लावले टाळे
अमेरिकेवरील शटडाऊनचे संकट टळले!
‘उत्तर प्रदेशमधील चकमकी राज्य-पुरस्कृत नाहीत’
पोलिसांनी या प्रकरणी पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. तसेच, आरोपी शिक्षकाला ताब्यात घेण्यात आले असून त्याची चौकशी सुरू आहे. राजस्थान बाल हक्क संरक्षण आयोगाच्या अध्यक्ष संगीता बेनिवल यांनीही या प्रकरणाची तातडीने दखल घेऊन जिल्हा शिक्षण अधिकारी आणि पोलिस अधीक्षकांना तीन दिवसांत अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.