दुबईला पळून जाताना अटक करण्यात आलेल्या सोने तस्कराने गुन्ह्याचा कागदपत्रासह डीआयआरच्या कार्यालयातून पळ काढल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी आझाद मैदान पोलीस ठाण्यात पळून गेलेल्या जैन विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याचा शोध घेण्यात येत आहे.
मेहुल अशोक कुमार जैन (२७) असे आरोपीचे नाव असून तो अहमदाबादचा रहिवासी आहे. सोन्याच्या तस्करीच्या प्रकरणा दरम्यान अहमदाबाद विभागाच्या डीआरआयच्या सोनतस्करीच्या गुन्हयात जैनचे नाव समोर आले होते आणि तो देशातून पळून जाण्याची शक्यता असल्याने केंद्रीय तपास संस्थेने १६ जून २०२३ रोजी त्याच्या नावाने लुक-आउट परिपत्रक (एलओसी) जारी केले होते. गुरुवारी जैन हा मुंबई छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरून दुबईला पळून जाण्याचा प्रयत्न करत असतांना विमानतळा वरील इमिग्रेशन अधिकाऱ्यांनी त्याला लुक-आउट सर्क्युलरवरून ताब्यात घेतले आणि डीआरआय अधिकाऱ्यांना माहिती देण्यात आली होती. त्यानंतर जैन याला डीआरआय अधिकाऱ्यानी ताब्यात घेऊन मुंबईतील चर्चगेट येथे असणाऱ्या डीआरआयच्या कार्यालयात आणण्यात आले होते.
त्यानंतर अहमदाबाद विभागाचे डीआयआर अधिकारी मुंबईत आले आणि त्यांनी जैन यांना सीमा शुल्क कायद्याच्या कलम १३५ अंतर्गत अटक केली. त्याला ट्रान्झिट रिमांडवर अहमदाबादला नेण्यासाठी मुंबईतील न्यायालयात हजर केले जाणार होते. जैन याला रात्रभर डीआरआयच्या कार्यालयात ठेवण्यात आले होते, असे पोलिसांनी सांगितले. दरम्यान डीआयआरचे सुरक्षा कर्मचारी पहाटे अडीचच्या सुमारास झोपी गेले तेव्हा जैन याने डीआयाआरच्या कार्यालयातून पळ काढला.
पळून जाण्यापूर्वी जैन याने संबंधित गुन्ह्यातील कागदपत्रे सोबत घेऊन गेला अशी माहिती पोलिसांनी दिली. सकाळी जैन कुठेच दिसत नसताना डीआरआयच्या सुरक्षा रक्षकांनी त्यांचा शोध सुरू केला, पण तो निष्फळ ठरला. या घटनेनंतर, डीआरआयच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती देण्यात आली.
हे ही वाचा:
कोविड सेंटरमधील घोटाळयाकडे दुर्लक्ष करण्यासाठी अधिकाऱ्यांना वाटले ६० लाखांचे सोने
उपमुख्यमंत्री फडणवीसांच्या हातून पाणी पिऊन ओबीसी महासंघाचे उपोषण मागे
शिक्षिकांचे विद्यार्थ्यांना आदेश…आमचे रिल्स लाइक करा, शेअर करा!
विसर्जन सोहळ्यादरम्यान हरवलेल्या २२ मुलांना पालकांकडे सोपवले!
वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार शुक्रवारी आझाद मैदान पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. डीआरआयच्या वतीने, डीआरआय अहमदाबाद विभागाचे गुप्तचर अधिकारी राकेश ओमप्रकाश रंजन यांचा जबाब नोंदवून आझाद मैदान पोलिसांनी मेहुल जैन विरोधात भारतीय दंड संहितेच्या कलम २२४ (एखाद्या व्यक्तीने त्याच्या कायदेशीर अटकेला प्रतिकार किंवा अडथळा) अंतर्गत गुन्हा दाखल केला असून त्याचा शोध घेण्यात येत आहे.