चीनमधील हांगझोऊ येथे सुरू असलेल्या १९ व्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताच्या खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी करून भारताची मान जगभरात उंचावली आहे. भारतीय खेळाडूंनी आशियाई स्पर्धा २०२३ मध्ये सातव्या दिवशी रौप्य पदकाची कमाई करत सुरूवात केली. १० मीटर एअर पिस्टल मिश्र दुहेरी संघाने पदकाची कमाई केली आहे.
भारताच्या १० मीटर एअर पिस्टल मिश्र दुहेरी संघाने भारताला शनिवार, ३० सप्टेंबर रोजी १३ वे रौप्य पदक पटकावून दिले. या संघात सरबजोत सिंग आणि दिव्या यांचा सामावेश होता. सुवर्ण पदकाच्या सामन्यात त्यांचा मुकाबला चीनशी होता. मात्र, या अंतिम सामन्यात त्यांना चीनच्या जोडीला पराभूत करण्यात यश आले नाही. सरबजोत आणि दिव्याने १४ गुण मिळवत दुसरे स्थान मिळवले तर चीनच्या संघाने १६ गुण मिळवत अव्वल स्थान पटकावले.
सुवर्ण पदकाचा अंतिम सामना सुरू झाला त्यावेळी भारताची जोडी सरबजोत सिंह आणि दिव्या यांनी ४ गुणांची आघाडी घेतली होती. पुढे त्यांनी चीनविरूद्ध ही आघाडी ७ – ५ अशी नेली. मात्र, चीनच्या संघाने ही ही पिछाडी भरून काढत भारताला कडवी झुंज दिली. अखेर अटीतटीच्या झालेल्या या सामन्यात चीनकडे १६ गुण होते तर भारताकडे १४ गुण होते. त्यामुळे भारतीय नेमबाजांना रौप्य पदकावर समाधान मानावे लागले.
हे ही वाचा:
‘जय श्री राम’चा नारा देण्यास नकार देणाऱ्या तरुणाला मारहाण करणाऱ्या दोघांना अटक
न्यूयॉर्कमध्ये पूर; रस्त्यांना आले नद्यांचे रूप
‘इतरांकडून भाषण स्वातंत्र्य शिकण्याची गरज नाही’
पुणेकर सुनील देवधरांचे वाढदिवसानिमित्त प्रशांत कारुळकरांकडून अभिष्टचिंतन
या रौप्य पदकानंतर भारताकडे आता ३४ पदके आहेत, भारताने आतापर्यंत ८ सुवर्ण १३ रौप्य आणि १३ कांस्य पदकांची कमाई केली आहे. भारत सध्या पदक तालिकेत चौथ्या स्थानावर आहे.