मुंबईच्या मुलुंड पश्चिमेकडील परिसरात एका सोसायटीत मराठी असल्यामुळे एका महिलेला कार्यालयासाठी जागा नाकारल्याचा धक्कादायक प्रकार गुरुवार, २८ सप्टेंबर रोजी समोर आला होता. संबंधित महिलेने यासंदर्भात सोशल मीडियावर पोस्ट टाकल्यानंतर मनसेने त्याची दखल घेऊन या सोसायटीच्या सेक्रेटरींना समज दिली होती. शिवाय त्यांच्यावर गुन्हाही दाखल झाला आहे. या प्रकरणानंतर भाजपाच्या राष्ट्रीय सरचिटणीस पंकजा मुंडे यांनी त्यांचा असाच एक अनुभव शेअर केला आहे.
सरकारी घर सोडून जेव्हा स्वत:चं घर घ्यायची वेळ आली, तेव्हा असाच अनुभव आल्याचं पंकजा मुंडे यांनी व्हिडीओमध्ये म्हटलं आहे. सरकारी घर सोडून घर घ्यायचं होतं. तेव्हा हा अनुभव बऱ्याच ठिकाणी आल्याचे त्या म्हणाल्या. ‘मराठी लोकांना आम्ही घर देत नाही’ असं ऐकावं लागल्याचे त्या म्हणाल्या. हे फार दुर्दैवी आहे. आत्ताचं राजकारणातलं वातावरण, समाजातलं वातावरण हे सगळं पाहता समाजात कुठेतरी अस्वस्थता वाटते. आरक्षणासाठी भांडणं चालू आहेत. प्रत्येक रंगात माणूस वाटला गेला आहे. हिरवा, भगवा, पिवळा, निळा आणि हे फार दुर्दैवी आहे, असं पंकजा मुंडे म्हणाल्या.
आपण कोणत्या एका भाषेची बाजू घेत नाही. कारण मुंबईचं सौंदर्य प्रत्येक भाषा, जात, धर्माने नटलेले आहे. ही देशाची राजकीय नसून आर्थिक राजधानी आहे. इथे सगळ्यांचं स्वागतच आहे. पण आम्ही अमुक लोकांना घर देत नाही असं जर काही इमारतींमध्ये बोलत असतील, तर हे दुर्दैवी आहे,” असे मत त्यांनी मांडले आहे.
हे ही वाचा:
जखमी श्वानाच्या मालकाचा रतन टाटा घेताहेत शोध
कुख्यात गुंड आतिकच्या भावाच्या बेनामी संपत्तीची रहस्ये उलगडली
तरुणाने आत्महत्येचे पर्याय शोधण्याचा प्रयत्न केला आणि पोलिसांनी त्याला हेरले!
कॅनडामध्ये प्रवेश मिळालेले तब्बल छत्तीस हजार विद्यार्थी चिंतेत
प्रकरण काय?
तृप्ती देवरुखकर नावाच्या महिलेने सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट केला होता. त्यात मुलुंड वेस्टमधील शिवसदन नावाच्या सोसायटीमध्ये आपण महाराष्ट्रीयन, मराठी असल्यामुळे आपल्याला कार्यालयासाठी जागा नाकारण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी याची दखल घेत सोसायटीच्या सेक्रेटरी आणि त्यांच्या वडिलांना जाब विचारला. या दोघांनी तृप्ती देवरुखकर यांची माफीही मागितली. तसेच, महाराष्ट्रातील मराठी माणसांचीही माफी मागितली.