कर्नाटकची राजधानी बंगळुरूमध्ये बुधवारी अभूतपूर्व वाहतूककोंडी झाली. अनेक प्रवासी तब्बल पाच तासांहून अधिक काळ कोंडीत अडकले होते. त्यामुळे सोशल मीडियावर तक्रारींचा पाऊस पडला होता.
बंगळुरूच्या रस्त्यांवर अनेक वाहने रस्त्यांवर तासन् तास अडकून पडली होती. अनेक गाड्या मध्येच बंद पडल्या होत्या. शहरातील आऊटर रिंग रोड परिसराला सर्वाधिक फटका बसला. तेथील प्रवासी तर तब्बल पाच तासांहून अधिक वेळ अडकले होते.
कावेरी नदीचे पाणी तमिळनाडूला सोडण्याच्या निषेधार्थ कन्नड संस्था आणि शेतकऱ्यांची संस्था असलेल्या ‘कर्नाटक जल संरक्षण समिती’ने ‘बंगळुरू बंद’ पुकारला होता. त्याच्या दुसऱ्या दिवशी ही वाहतूककोंडी झाली. त्यामुळे सोशल मीडियावर तक्रारींचा पाऊस पडला. अनेक प्रवाशांनी रात्री नऊपर्यंत तरी कार्यालय सोडू नका, असे आवाहन केले तसेच, आऊटर रिंग रोड, मराठाहल्ली, सर्जापुरा आणि सिल्कबोर्ड मार्गांचा वापर करू नका, असाही सल्ला दिला. ‘तीन तासांत केवळ दीड किमी. भयानक,’ अशी प्रतिक्रिया एका प्रवाशाने ‘एक्स’वर दिली. तर, दुसऱ्याने एक किमी अंतर कापण्यासाठी त्याला दोन तास लागल्याचे नमूद केले. तर, आणखी एकाने दावा केला की, महाभयंकर वाहतूककोंडीमुळे शाळेच्या बसने त्याच्या मुलांना रात्री आठ वाजता घरी सोडले. अनेकांनी या वाहतूककोंडीचे खापर स्थानिक प्रशासनावर फोडले.
हे ही वाचा
विमानतळांची कामे मार्गी लावण्यासाठी खासगी कंपनीकडील पाच विमानतळांचा ताबा ‘एमआयडीसी’ने घ्यावा
सन २०२४ आणि २०२९मध्ये ‘एक देश, एक निवडणूक’वर उमटू शकते मोहोर!
नगरसेवकांचा सहानुभूतीवर भरोसा नाय काय?
कोल्हापुरात दोन मंडळांमध्ये राडा; दगडफेकीत तीन जखमी
वाहतूककोंडीची अनेक कारणे
बंगळुरूमध्ये मोठी कोंडी झाल्याची अनेक कारणे सांगितली जात आहेत. भारताच्या दौऱ्यावर आलेला कॉमेडियन ट्रेव्हर नोहा याने बेंगळुरूमधील आऊटर रिंग रोड परिसरात होणारा कार्यक्रम रद्द केला. तोही वाहतूककोंडीत अडकल्याने त्याला त्याच्या कार्यक्रमस्थळी पोहोचायला ३० मिनिटांहून अधिक वेळ लागला. या कार्यक्रमाची तिकिटे खरेदी केलेल्या बंगळुरूमधील अनेक नागरिकांनी या कार्यक्रमाला जाण्यासाठी लवकर कार्यालय सोडले होते. त्यामुळेच कार्यक्रमाच्या स्थळी जाणाऱ्या आऊटर रिंग रोडवर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. प्रवाशांना कार्यक्रमस्थळी पोहोचायला दोन ते तीन तास लागले. यावेळी या मार्गावरील वाहनांची संख्या नेहमीच्या वाहनांपेक्षा दुपटीहून अधिक होती. एरवी येथून दीड ते दोन लाख वाहने जातात. मात्र संध्याकाळी साडेसात वाजेपर्यंत येथून तीन लाख ५९ वाहनांची वाहतूक झाली, अशी माहिती वाहतूक पोलिसांनी दिली.
त्याचवेळी जोडून सुट्ट्या आल्यामुळे अनेकांनी शुक्रवारी सुट्टी टाकून शहरातून बाहेर जाण्याचा पर्याय निवडला. त्यामुळेही रस्त्यावर कोंडी झाली होती. हे कमी म्हणून की काय, अवचित पडलेल्या पावसाने शहरातील अनेक अंतर्गत रस्त्यांवर पाणी साचले होते. त्यामुळे साडेतीन ते पाच वाजेपर्यंत अनेक गाड्या रस्त्यांवरच बंद पडल्या होत्या. शहरातील अनेक भागांत गणेश विसर्जन असल्यामुळे कोंडीत आणखी भर पडली.