उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या तीन माजी नगरसेवकांनी आज शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला. न्यूज डंकाने जोगेश्वरीचे नगरसेवक प्रवीण शिंदे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत यापुढे काम करणार असून मंगळवारी शिवसेनेत प्रवेश करतील असे वृत्त दिले होते. त्याप्रमाणे शिंदे यांनी शिवसेनेत रीतसर प्रवेश केला.
याप्रसंगी त्यांचे तसेच त्यांच्यासोबत पक्षात प्रवेश घेतलेल्या सर्व पदाधिकाऱ्यांचे पक्षात स्वागत करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांना भावी सामाजिक आणि राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. मंगळवारी पक्षप्रवेश झालेल्यांमध्ये जोगेश्वरी येथील प्रभाग क्रमांक ७३ चे माजी नगरसेवक प्रवीण शिंदे, वर्सोवा विधानसभा क्षेत्रातील माजी नगरसेविका प्रतिमा खोपडे आणि प्रभाग क्रमांक ८८ च्या माजी नगरसेविका स्नेहल शिंदे यांचा समावेश होता. त्यांच्यासह जोगेश्वरी, वर्सोवा आणि विलेपार्ले विभागातील अनेक पदाधिकाऱ्यांनीही शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश केला. मुंबईत आतापर्यंत उबाठा गटाच्या ३३ माजी नगरसेवकांनी शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला असून आता ही संख्या ३६ झाली आहे.
हे ही वाचा:
घाऊक विक्रेत्यांच्या तूर, उडीद डाळीचा साठा आता २०० वरून ५० टन
विद्यार्थ्यांच्या राजकारणाचे पर्यवसान आंतरराष्ट्रीय गँगस ऑफ पंजाबमध्ये
एअर इंडियाच्या फ्लाईट अटेंडन्ट आता साडीत दिसणार नाहीत!
भारतीय खेळाडू ‘घोड्या’वर स्वार
जोगेश्वरीचे नगरसेवक आणि बेस्ट समितीचे चेअरमन असलेल्या प्रवीण शिंदे यांनी एकनाथ शिंदे यांना साथ देण्याचे ठरविल्यामुळे उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे.
यावेळी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, महायुती सरकार सत्तेत आल्यापासून मुंबईत अनेक विकासकामे वेगाने सुरू झाली असून त्यामुळे या आंतरराष्ट्रीय शहराला खऱ्या अर्थाने आंतरराष्ट्रीय शहर बनवण्याचा प्रयत्न सुरू झाला असल्याचे त्यांनी सांगितले. मुंबईतील रखडलेल्या इमारतींचा पूर्णविकासाला गती देऊन मुंबईतून बाहेर गेलेला मराठी माणूस पुन्हा मुंबईत घेऊन येणार असल्याचे यावेळी बोलताना सांगितले.