खलिस्तानी दहशतवादी हरप्रीतसिंग निज्जर याच्या हत्येच्या पार्श्वभूमीवर भारत आणि कॅनडामधील संबंध आणखी चिघळले आहेत. निज्जर याच्या हत्येत भारत सरकारच्या एजंटचा हात असल्याचा गुरुवारीही पुनरुच्चार करणाऱ्या कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी या संदर्भातील पुरावे देण्यास मात्र नकार दिला आहे. त्यांनी या संदर्भात कायदेशीर प्रक्रिया सुरळीत चालू दे, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.
‘कॅनडामध्ये एका कॅनेडियन व्यक्तीच्या हत्येमागे भारत सरकारच्या एजंटचा सहभाग होता. हरप्रीत सिंग निज्जर याच्या हत्याप्रकरणात न्याय मिळावा, यासाठी भारत सरकारने कॅनडा सरकारला मदत केली पाहिजे,’ अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. या हत्येमागे भारत सरकारचा सहभाग असल्याबाबत विश्वासार्ह माहिती असल्याचा दावाही त्यांनी केला.
‘कोणत्याही देशाला त्याच्या भूमीवर कोणा नागरिकाची हत्या होत असेल, तर तो देश कसे स्वीकारेल? त्यामुळे मी माझ्या भूमिकेवर ठाम आहे. मी हा मुद्दा ‘हाऊस ऑफ कॉमन्स’मध्ये अतिशय गंभीरपणे मांडला आहे. या आरोपांकडे भारताने दुर्लक्ष करू नये,’ असे ट्रुडो म्हणाले. तसेच, त्यांनी या प्रकरणात भारत सरकारने सर्वतोपरी साह्य करावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
हे ही वाचा:
दहशतवादी, गुन्हेगारांबद्दल केंद्र सरकारची टीव्ही वृत्तवाहिन्यांना सूचना
सनातन धर्मावर टिप्पणी केल्याप्रकरणी उदयनिधी स्टॅलिनला सर्वोच्च न्यायालयाची नोटीस !
ऐतिहासिक महिला विधेयक संसदेत मंजूर!
‘जातीय अपशब्द, शिवीगाळ’ प्रकरणी ख्रिश्चन मिशनचा प्रमुख फादरवर गुन्हा !
‘भारताचे महत्त्व वाढत आहे’
‘भारताचे महत्त्व जगभरात वाढत आहे, याबद्दल कोणतीच शंका नाही. आम्हाला भारतासोबत केवळ एका क्षेत्रात नव्हे तर अनेक क्षेत्रांत काम करायचे आहे. त्यामुळे भारताला चिथवण्याचा किंवा भडकवण्याचा आमचा उद्देश नाही. मात्र आम्ही कायद्याचे राज्य चालवण्यास आणि कॅनडामधील लोकांचे संरक्षण करण्यास बांधील आहोत. त्यामुळेच भारताने या हत्याप्रकरणात न्याय मिळवून देण्यासाठी सहकार्य करावे,’ असे आवाहन ट्रुडो यांनी केले आहे.