काहींना शर्टाची बटणे उघडे ठेवण्यास आवडते तर अनेकांना शर्ट घातल्यानंतर अवघडल्यासारखं वाटते म्हणून बटन लावत नाहीत.अनेकजण रुबाब दाखवण्यासाठी तसेच भाईगिरी दाखवण्यासाठी बटणे लावण्याचे टाळतात.मात्र, शर्टाची बटणे न लावल्यामुळे चौघांना चांगलाच महागात पडलं आहे.शर्टाचे बटन न लावल्यामुळे तसेच असभ्य वर्तनामुळे नांदेडमधील लोहा पोलिसांनी चौघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.या घटनेने सर्वत्र चांगलीच चर्चा रंगली आहे.
काही कामानिमित्त गुन्हा दाखल झालेल्या चौघांना लोहा पोलिसांनी ठाण्यात बोलावले होते.या चौघांनी ठाण्यात प्रवेश केला तेव्हा त्यांच्या शर्टाची बटणे खुली होती तसेच मोठ्या आवाजाने बोलत असभ्य वर्तन करत होते.लोहा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचालकर यांच्या हे निदर्शनास आहे. त्यानंतर पोलिसांनी या चौघांविरोधात गुन्हा दाखल केला.कोणताही गुन्हा नसताना अचानकपणे गुन्हा दाखल झाल्याने या चौघांनाही धक्का बसला.
हे ही वाचा:
कॅनडाला भारताशी पंगा भारी पडणार; आर्थिक फटका बसण्याची शक्यता
कॅनडातल्या भारतीयांनो खबरदारी घ्या…भारताकडून आवाहन
अमेरिकेतले संसद सदस्य फेटरमन आले चक्क हाफ पॅन्टमध्ये !
३५ हजाराहून अधिक महिलांकडून अथर्वशीर्षाचे पठण
यासंदर्भात पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचालकर यांनी सांगितले की, पोलीस स्टेशन हे सार्वजनिक आणि शिस्तीचे ठिकाण आहे. त्यामुळे हुल्लडबाजी करणाऱ्यांची कोणतीही हयगय केली जाणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पोलीस स्टेशनला कोणत्याही कामासाठी गेला असाल तरी वर्तवणूक ही चांगली, सभ्य असावी. आवाजही कमी असावा, अन्यथा मुंबई पोलीस कायदातंर्गत गुन्हा दाखल होऊ शकतो असे त्यांच्याकडून सांगण्यात आले.मात्र, लोहा पोलिसांनी केलेल्या कारवाईची सध्या नांदेड जिल्ह्यात चर्चा सुरू आहे.