कॅनडाचा नागरिक आणि खलिस्तानी दहशतवादी हरदीपसिंग तिज्जर याच्या हत्येमागे भारताचा संबंध असल्याचा आरोप कॅनडाच्या पंतप्रधानांनी केल्यानंतर आता आणखी एक आगाऊपणा कॅनडाने केला आहे. भारतीय आणि कॅनडाचे संबंध बिघडले आहेत. या पार्श्वभूमीवर कॅनडाच्या सरकारने सध्या भारतात राहणाऱ्या कॅनडाच्या नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे. कॅनडा सरकारच्या वेबसाइटवर या संदर्भात मार्गदर्शक तत्त्वे जाहीर करण्यात आली आहेत.
खलिस्तानी दहशतवादी निज्जर याच्या हत्येत भारत सरकारचा सहभाग असल्याचा आरोप कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी केल्यानंतर कॅनडा सरकारने भारतात राहणाऱ्या नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन केले आहे.
निज्जरच्या हत्येचे खापर भारतावर फोडून पुन्हा भारतातच कसे कॅनडातील नागरिकांना सुरक्षित वातावरण नाही असे चित्र कॅनडाने उभे केले आहे. त्यांनी म्हटले आहे की, ‘भारतात राहताना काळजीपूर्वक राहावे, सतर्क राहावे. देशभरात कुठेही दहशतवादी हल्ला होण्याची भीती आहे,’ असे या मार्गदर्शक तत्त्वांत नमूद करण्यात आले आहे.
‘सुरक्षेबाबत चिंता करण्याजोगा काही बाबी आहेत किंवा परिस्थिती कधीही बदलू शकते. नेहमी अत्यंत सावध राहा, स्थानिक माध्यमांवर लक्ष ठेवा आणि स्थानिक अधिकाऱ्यांच्या सूचनांचे पालन करा,’ असे त्यात नमूद करण्यात आले आहे. तसेच, त्यांनी कॅनडाच्या नागरिकांना भारतातील अनावश्यक प्रवास टाळण्याचे सुचविले आहे. ‘तुमची सुरक्षा धोक्यात येऊ शकते. तुमचे कुटुंब किंवा व्यावसायिक आवश्यकता, प्रदेशाचे ज्ञान किंवा त्याची ओळख तसेच अन्य घटकांचा विचार करूनच भारतात प्रवेश करावा. जर तुम्ही भारतात आधीपासूनच असाल तर, खरोखरच तुम्ही तिथे असण्याची गरज आहे का, याचा विचार करा. जर तुम्हाला तिथे असण्याची गरज नसेल, तर तुम्ही तातडीने तेथून निघण्याचा विचार करा,’ असेही यात नमूद करण्यात आले आहे.
तसेच, नागरिकांनी ‘अनपेक्षित सुरक्षा परिस्थिती’ मुळे जम्मू आणि काश्मीरचा प्रवास टाळावा, अशीही सूचना करण्यात आली आहे. दहशतवाद, नागरी अशांतता आणि अपहरणाचा धोका असल्यामुळे जम्मू काश्मीरमध्ये जाऊ नये, असे सांगण्यात आले आहे. मात्र या मार्गदर्शक नियमांतून लडाख या केंद्रशासित प्रदेशाला वगळण्यात आले आहे.
हे ही वाचा:
३५ हजाराहून अधिक महिलांकडून अथर्वशीर्षाचे पठण
तामिळ संगीतकार, अभिनेता विजय अँटनी यांच्या मुलीने केली आत्महत्या !
इंग्लंडमध्ये चेतेश्वर पुजारा एका सामन्यासाठी निलंबित !
अनंतनाग हल्ल्याचा मास्टरमाईंड उजैर खानचा खात्मा !
भारताने ट्रुडो यांचा दावा फेटाळला
भारताने कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी निज्जर याच्या हत्येमागे भारताचा संबंध असल्याचा दावा फेटाळून लावला आहे. हा आरोप निराधार आणि कोणत्या तरी विशिष्ट हेतूने प्रेरित असल्याचा दावा भारताने केला आहे. हा दावा सिद्ध करण्यासाठी त्यांच्याकडे कोणतेही पुरावे नाहीत आणि यामागे त्यांचे वेगळीच राजकीय समीकरणे आहेत, असे भारताने नमूद केले आहे.