भारताच्या चांद्रयान- ३ च्या यशानंतर आता साऱ्या जगाचे लक्ष हे भारताच्या सौर मोहिमेवर आहे. आदित्य एल- १ हे २ ऑगस्ट रोजी सकाळी ११.५० वाजता आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून प्रक्षेपित करण्यात आले होते. ही भारताची पहिली सूर्य मोहीम आहे. दरम्यान आदित्य एल- १ बाबत मोठी अपडेट समोर आली आहे.
आदित्य एल- १ या यानाने वैज्ञानिक डेटा गोळा करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात केली आहे, इस्रोने अशी माहिती एक्सवरून (ट्विटर) दिली आहे. STEPS उपकरणाच्या सेन्सर्सने पृथ्वीपासून ५० हजार किमी पेक्षा जास्त अंतरावरुन सुप्रा-थर्मल आणि ऊर्जावान आयन आणि इलेक्ट्रॉन मोजण्यास सुरुवात केली आहे. हा डेटा शास्त्रज्ञांना पृथ्वीभोवती असलेल्या कणांच्या वर्तनाचे विश्लेषण करण्यास मदत करतो.
Aditya-L1 Mission:
Aditya-L1 has commenced collecting scientific data.The sensors of the STEPS instrument have begun measuring supra-thermal and energetic ions and electrons at distances greater than 50,000 km from Earth.
This data helps scientists analyze the behaviour of… pic.twitter.com/kkLXFoy3Ri
— ISRO (@isro) September 18, 2023
इस्रोने या माहितीचा आलेख शेअर केला आहे. आदित्य एल- १ चा डेटा संकलनाचा हा दुसरा टप्पा आहे. आदित्य एल- १ मध्ये स्थापित केलेल्या STEPS या उपकरणाद्वारे हे काम केले जात आहे. या उपकरणात सहा सेन्सर्स आहेत आणि ते सर्व वेगवेगळ्या दिशांमधून सुप्रा थर्मल आणि ऊर्जावान आयनांची माहिती गोळा करणार आहेत. हे उपकरण जे डेटा देईल तो पृथ्वीभोवती असलेल्या कणांबद्दल, विशेषतः तिच्या चुंबकीय क्षेत्राची उपस्थिती जाणून घेण्यास मदत करेल. हे उपकरण १० सप्टेंबर रोजी पृथ्वीपासून ५० हजार किमी अंतरावरून कार्यान्वित करण्यात आले. त्यामुळे लवकरच शास्त्रज्ञांना सूर्याची अनेक रहस्ये उलगडण्यास मदत होणार आहे.
हे ही वाचा:
पेट्रोल भाववाढीने खचलेल्या पाकिस्तानने काढला ‘इराणी’ पेट्रोल पंपांवर राग
संसदेचे विशेष अधिवेशन ऐतिहासिक निर्णयांचे ठरणार
बेस्ट बसमध्ये पैसे विसरणारे प्रवासी वाढले; चार वर्षांत ८ हजार छत्र्याही लोक विसरले
भारताने आठव्यांदा जिंकला आशिया चषक
पाच टप्प्यांमध्ये पूर्ण होणार प्रवास
पाच टप्प्यांमध्ये आदित्य यान सूर्याचा प्रवास करणार आहे. पीएसएसव्ही रॉकेटच्या माध्यमातून हे यान पृथ्वीच्या खालच्या कक्षेत प्रस्थापित करण्यात येणार आहे. त्यानंतर हे यान पृथ्वीच्या कक्षेतच फिरेल. दुसऱ्या टप्प्यात हे यान पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण शक्तीच्या बाहेर काढण्यात येईल. तिसऱ्या टप्प्यात या यानाच्या सूर्याच्या दिशेने प्रवासाला सुरुवात होईल. चौथ्या टप्प्यात हे यान लॅग्रेंज बिंदूच्या कक्षेत प्रस्थापित करण्यात येईल. पाचव्या टप्प्यात हे यान सूर्याचा अभ्यास करण्यास सुरुवात करेल. पुढील पाच वर्षांसाठी हे यान सूर्याचा अभ्यास करण्यासाठी इस्रोला मदत करणार आहे. याठिकाणी पोहोचण्यासाठी सुमारे चार महिन्यांचा कालावधी लागेल.