चांगल्या करीअरच्या स्वप्न पूर्ण करण्यासाठी राजस्थानच्या कोटा शहरात आलेल्या विद्यार्थ्यांचा जीव येथे का घुसमटतो आहे? एका पाठोपाठ एक विद्यार्थी येथे जीव का देत आहेत? याचे उत्तर एका १७ वर्षीय मुलीने दिले आहे. कोटामध्ये शिकणारी ही १७ वर्षीय विद्यार्थिनी आत्महत्या करण्यासाठी जात होती. ती गळफास घेत असतानाच तिच्या भावाचा फोन आला आणि तिचा जीव वाचला.
हे ही वाचा:
बेस्ट बसमध्ये पैसे विसरणारे प्रवासी वाढले; चार वर्षांत ८ हजार छत्र्याही लोक विसरले
भारताने आठव्यांदा जिंकला आशिया चषक
‘इंडी’ आघाडी पत्रकारांवरील बहिष्कार मागे घेणार?
संगीत नाटक अकादमी अमृत पुरस्काराने महाराष्ट्रातील सात कलावंतांना सन्मान
या विद्यार्थिनीने नुकतीच बारावीची परीक्षा दिली होती आणि ती नीटची तयारी करण्यासाठी कोटा गेली होती. मात्र एक महिन्यानंतर तिला निराशेने ग्रासले. तेथे चार-पाच वर्षांपासून तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना पाहून तिचा ताण अधिकच वाढला. तिने याबाबत तिच्या शिक्षकांनाही सांगितले. मात्र तरीही तिची भीती कमी झाली नाही. ‘मला माझ्या खोलीत एकटे राहावेसे वाटेना. मी पळून एखाद्या बागेत किंवा मंदिरात जात असे. माझ्या आई-वडिलांनी माझ्यावर खूप पैसे खर्च केले आहेत, हाच विचार सारखा माझ्या डोक्यात येत असे,’ असे या विद्यार्थिनीने सांगितले.
हा विचार सुरू असतानाच या विद्यार्थिनीच्या मनात आत्महत्येचा विचार आला. ती पंख्याला लटकण्यासाठी ओढणी शोधत असतानाच तिच्या भावाचा फोन आला आणि तिच्या तोंडून आत्महत्येचा विचार बाहेर पडला. तेव्हा तिच्या भावाने तिच्या कुटुंबाला सर्व हकीकत सांगितली. त्यानंतर तिच्या कुटुंबाने तिला घरी बोलावले. आता ती मुलगी तिच्या घरी असून ती तिथेच बसून ‘नीट’ परीक्षेची तयारी करत आहे.