बेस्ट बसमध्ये रोख रक्कम विसरणाऱ्या प्रवाशांमध्ये वाढ झाली आहे. या वर्षीच्या जानेवारी ते जुलै कालावधीतील प्रमाणाची तुलना केल्यास ही वाढ गेल्या वर्षीच्या याच कालावधीपेक्षा १३ टक्क्यांनी अधिक आहे. बेस्ट प्रशानाने या आठवड्यात जाहीर केलेल्या पत्रकात ही बाब उघड झाली आहे. अर्थात बसमध्ये सोने, चांदीचे आणि हिऱ्यांचे दागिने विसरण्याच्या प्रमाणात २३ टक्क्यांनी घट झाली आहे, हे विशेष!
यंदाच्या वर्षी जानेवारी ते जुलै या कालावधीत बेस्टमधील सीटच्या मागे सापडलेली एकूण पाकिटे आणि बॅगांमध्ये सुमारे सात लाख रोकड सापडली. गेल्या वर्षी याच कालावधीत सहा लाख २० हजारांची रोकड सापडली होती. तर, यंदा कंडक्टरना सोने-चांदी-हिऱ्यांचे ३६ दागिने सापडले. गेल्या वर्षी याच कालावधीत ४७ दागिने सापडले होते.
मार्च, २०२०मध्ये करोना साथीला सुरुवात झाल्यापासून ते या वर्षीच्या जुलै महिन्यांपर्यंत बेस्टच्या बसगाड्यांमध्ये सुमारे ४० लाखांची रोकड सापडली आहे. म्हणजे दर महिन्याला या बसमध्ये किमान एक लाख रुपये सापडतात. हे प्रमाण करोनापूर्व काळाच्या तुलनेत सुमारे २० टक्के अधिक आहे. करोनापूर्व कालावधीत दर महिन्याला सरासरी ८० हजार रुपये रोख रक्कम सापडत असे, असे एका अधिकाऱ्याने सांगितले.
हे ही वाचा:
कर्मयोगी, सुदृढ नेतृत्व, लोककल्याणकारी अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदींना शुभेच्छा!
भारतीय मसाल्यांबाबतचे जगभरात असलेले आकर्षण पुन्हा निर्माण करा
संसदेच्या विशेष सत्रापूर्वी आरएसएसच्या बैठकीत महिला आरक्षणावर चर्चा
संगीत नाटक अकादमी अमृत पुरस्काराने महाराष्ट्रातील सात कलावंतांना सन्मान
मोबाइल फोन आणि छत्र्याही…
सप्टेंबर २०२०मध्ये बसगाड्यांमध्ये सर्वाधिक मोबाइल फोन विसरले गेले. त्याखालोखाल ऑक्टोबर २०२२ आणि या वर्षीच्या मे महिन्यात सर्वाधिक फोन सापडल्याची नोंद झाली. या वर्षी सुमारे ५०० मोबाइल फोन बसमध्ये विसरले गेले. तर, एक हजार ३३५ प्रवासी त्यांच्या छत्र्या बसमध्ये विसरले. सुमारे ४५ टक्क्यांहून अधिक रक्कम आणि मोबाइल फोन प्रवाशांनी परत घेतली असून अन्य वस्तू बेस्टच्या तिजोरीत सुरक्षित ठेवण्यात आल्या आहेत. हरवलेल्या वस्तू सुरक्षितपणे जवळच्या डेपोमध्ये ठेवल्या जातात. तीन दिवसांच्या आत त्याच्यावर दावा केल्यास कोणताही दर न आकारता त्या परत केल्या जातात. मात्र त्यानंतर त्या वस्तू वडाळा डेपोमधील ‘गहाळ झालेल्या व सापडलेल्या वस्तू’ या विभागामध्ये ठेवल्या जातात. तेथे त्यांच्यावर १४ टक्के ( घट) दर आकारला जातो.
चार पावसाळ्यांत साडेआठ हजार छत्र्या विसरल्या
गेल्या चार पावसाळ्यांत म्हणजेच सन २०२० ते २०२३ या कालावधीत सुमारे आठ हजार ४००हून अधिक छत्र्या प्रवासी बसमध्ये विसरले आहेत. अनेक प्रवासी छत्र्या घेण्यासाठी परत येतही नाहीत. करोनाकाळात सुमारे २६१ प्रवासी त्यांच्या हरवलेल्या छत्र्या घेऊन जाण्यासाठी आले होते. मोबाइल फोन तसेच अन्य वस्तू घेण्यासाठी दीर्घकाळ कोणीही प्रवासी न आल्यास या वस्तूंचा बेस्ट प्रशासनातर्फे लिलाव केला जातो. गेल्या दहा वर्षांत सुमारे एक कोटीहून अधिक रोख रक्कम आणि वस्तू गहाळ झाल्या आहेत. त्यामुळे आपल्या वस्तूंची काळजी घ्यावी, असे आवाहन बसमध्ये चढण्यापूर्वीच प्रवाशांना केले जाते, असे एका अधिकाऱ्याने सांगितले.