जम्मू आणि काश्मीरमधील अनंतनाग येथे दोन दिवसांपूर्वी झालेल्या चकमकी दरम्यान भारताने तीन जवानांना गमावले. दरम्यान, बारामुल्ला जिल्ह्यातील उरी, हातलंगा या फॉरवर्ड भागात देखील दहशतवादी, लष्कर आणि बारामुल्ला पोलिसांमध्ये चकमक सुरू झाली आहे. या चकमकीत एका दहशतवाद्याला कंठस्नान घालण्यात यश आले आहे. पोलीस आणि सुरक्षा दलांकडून इतर दहशतवाद्यांचा खात्मा करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. जम्मू-काश्मीर पोलिसांनी यासंबंधीची माहिती दिली आहे.
बारामुल्ला जिल्ह्यातील या परिसरात तीन आतंकवादी असल्याची गुप्त माहिती मिळाली होती त्यानंतर सुरक्षा दल आणि पोलिसांकडून शोधमोहिम सुरू करण्यात आली. दरम्यान दहशतवाद्यांना शोधण्यासाठी मागच्या चार दिवसांपासून संयुक्त कारवाई सुरू आहे.
काश्मीरमधील कोकेरनाग भागात अजूनही दहशतवाद्यांशी चकमक सुरू आहे. चकमकीच्या ठिकाणी सुरक्षा दलांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे. कोकेरनागच्या गडोलेच्या जंगल परिसरात शोधमोहीम सुरू आहे. लवकरच दहशतवाद्यांचा खात्मा केला जाईल, असे जम्मू-काश्मीर पोलिसांचे म्हणणे आहे.
सध्या सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू असून दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी लष्कर ड्रोनचाही वापर करत आहे, या ड्रोन्सच्या कॅमेऱ्यांनी दहशतवाद्यांच्या हालचाली देखील टिपल्या आहेत. दहशतवादी डोंगर आणि जंगलात लपून बसल्याचे सांगण्यात येत आहे.
हे ही वाचा:
निपाह व्हायरस संसर्गाच्या पार्श्वभूमीवर कोझिकोडमधील शैक्षणिक संस्था बंद
आदित्य एल-१ने चौथ्यांदा यशस्वीपणे बदलली कक्षा
सन २०२३मध्ये ९६ टक्के प्रकरणे निकाली निघाली; सर्वोच्च न्यायालयाने दिली माहिती
सुरक्षा दलाची दहशतवाद्यांविरोधात शोध मोहीम सुरूच आहे. दहशतवाद्यांचा माग काढण्यासाठी लष्कराने डोंगराला वेढा घातला आहे. क्वाडकॉप्टर, ड्रोन आणि इतर आधुनिक उपकरणांच्या सहाय्याने दहशतवाद्यांवर नजर ठेवण्यात येत आहे. पॅरा कमांडोजनीही कारवाईत सहभागी झाले आहेत. घनदाट जंगल आणि डोंगराळ भाग यामुळे हे विशेष पथक तैनात करण्यात आले आहे. याशिवाय टेकडीवर दहशतवाद्यांच्या लपलेल्या ठिकाणावर रॉकेट देखील डागण्यात आले आहेत.