देशात दंगली घडवण्याचे भाजपाचे षडयंत्र आहे, असा आरोप शिउबाठाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे वारंवार करीत असतात. प्रत्यक्षात या कामात काँग्रेसने आघाडी घेतल्याचे उघड झाले आहे. हरयाणातील नूहमध्ये झालेल्या दंगलप्रकरणात काँग्रेसचा आमदार मामन खान याला अटक करण्यात आली आहे. इंडी आघाडीतील प्रमुख घटक पक्षाच्या आमदारावर दंगलीचा मास्टर माईंड असल्याचा ठपका आहे. देशात दंगली घडवण्याचे भाजपाचे षडयंत्र आहे, असा दावा करणारे उद्धव ठाकरे आणि त्यांचे नेते या मुद्द्यावर काँग्रेसला जाब विचारणार आहेत का? शक्यता कमी आहे, कारण मालकाला जाब विचारण्याची पद्धत नाही. जाब विचारण्याइतपत ताकदही नाही.
हिंगोली आणि जळगावमध्ये उद्धव ठाकरे यांच्या सभा झाल्या. या दोन्ही सभांमध्ये ‘राम मंदिराच्या सोहळ्यासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून लाखो हिंदुंना बोलावतील. बसेस बोलावतील, ट्रेन्स आणतील आणि सोहळ्यावरून परत जाताना मुस्लीम वस्तीत किंवा कुठेतरी त्या गाड्यांवर किंवा रेल्वेवर दगडफेक करून देशात दंगली पेटवल्या जातील’, अशी भीती त्यांनी व्यक्त केली आहे.
त्यांच्या पक्षाचे नेते संजय राऊत हे तर गेले वर्षभर सांगतायत की, देशात प्रायोजित दंगली घडवण्याचे कारस्थान सुरू आहे.
काँग्रेसने त्यांच्या सूरात सूर मिसळलेला आहे. देशात दंगलींच्या नावाखाली झालेला भीषण रक्तपात हा काँग्रेसच्या काळात झालेला, काँग्रेस पुरस्कृत आहे, ही वस्तूस्थिती. मुंबईत १९९२ दंगल झाली तेव्हा काँग्रेस सत्तेत होती. १९८९ चा भागलपूरचा दंगा झाला तेव्हाही काँग्रेसचे सरकार होते. १९८४ मध्ये दिल्लीत झालेला शिखांचा नरसंहार हा तर पूर्णपणे काँग्रेस पुरस्कृत होता.
देशातील जनता मूर्ख आणि विसरभोळी आहे, असा समज झाल्यामुळे काँग्रेस नेते राहुल गांधी मोहोब्बत की दुकानची सध्या जोरदार जाहिरात करतायत. इतिहासाकडे नजर टाकली तर लक्षात येईल की काँग्रेस हा देशातला सगळ्या मोठा नफरतचा मॉल आहे.
हरयाणातील नूह दंगलींचा आरोपी काँग्रेस आमदार मामन खान याच्या अटकेमुळे देशातील दंग्यांचे सूत्रधार कोण आहेत, हे उघड झाले आहे. मोहोब्बत की दुकान म्हणजे काय याचा नेमका अर्थ जनतेलाही कळला आहे. नूहमध्ये विश्वहिंदू परीषदेने आयोजित केलेल्या ब्रजमंडल यात्रेवर झालेल्या हल्ल्यानंतर नूहमध्ये दंगल भडकली. जाळपोळ, तोडफोडीचे प्रकार झाले. काँग्रेस आमदार मामन खान हा या दंगलीचा सूत्रधार आहे. त्याच्या विरोधात प्रत्यक्षदर्शी, फोन रेकॉर्डींग, व्हॉट्सअप चॅट आदी भक्कम पुरावे आहेत, अशी माहीती नूहचे पोलीस अधिक्षक नरेंद्र बिजारनीया यांनी उघड केली आहे. नूहमधल्या हिंसेचे पाकिस्तान कनेक्शनही आहे. तिथून आलेले काही मेसेज गुप्तचर संस्थांनी इंटरसेप्ट केले आहेत.
दिल्ली दंग्यात सुद्धा हेच झाले. दिल्लीत २०२० मध्ये दंगा भडकला होता. यात इंटेलिजन्स ब्युरोचे अधिकारी अंकीत शर्मा यांची निर्घृण हत्या करण्यात आली होती. आम आदमी पार्टीचा आमदार ताहीर हुसैन याचा सूत्रधार होता. त्याच्यासह १० जणांवर पोलिसांनी आरोपपत्र दाखल केले आहे.
पश्चिम बंगालमध्ये राज्य सरकार पुरस्कृत दंगा होता. तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांच्या उपस्थितीत महिलांना विवस्त्र केल्याच्या घटनाही घडलेल्या आहेत. हे तमाम पक्ष भाजपाविरोधी इंडी आघाडीचे सदस्य आहेत. ज्या आघाडीत ठाकरे आणि राऊत यांचा पक्ष सहभागी आहे. परंतु, मामन खान, ताहीर हुसैन यांच्याबाबत मिठाची गुळणी करणारे संजय राऊत आणि त्यांचे मालक उद्धव ठाकरे आणि राहुल गांधी या घटनांचा ठपका भाजपावर ठेवताना दिसतात.
संजय राऊत यांचे ज्ञान अगाध आहे. मणिपूरमध्ये चीनने घुसखोरी केली आहे, असा अफाट शोध अलिकडे त्यांनी लावला. मणिपूरची सीमा कुठेही चीनला भिडलेली नाही. मणिपुरचे शेजारी राष्ट्र म्यानमार आहे. तरीही तोंडाला येईल ते बोलायचे. खोटे असले तरीही रेटून बोलायचे ही राऊतांची खासियत आहे. पत्राचाळ प्रकरणातील भ्रष्टाचाराच्या आरोपामुळे तुरुंगवास भोगावा लागल्यामुळे राऊत अधिक बेताल झाले आहेत. आता तर खिचडी घोटाळ्याच्या रकमा त्यांच्या कुटुंबियांच्या खात्यात गेल्याचे स्पष्ट झाले आहे. पुन्हा तुरुंगात जाण्याची वेळ आली आहे. त्यामुळे भाजपाच्या विरोधात शक्य तेवढी गरळ ओकायची हे त्यांचे धोरण आहे.
हे ही वाचा:
गणेशोत्सव मंडळांना पाच वर्षांसाठी एकदाच घ्यावी लागणार परवानगी
चार जवान शहीद म्हणजेच पाकिस्तानातील दहशतवाद्यांचे तळ कायम असल्याचे संकेत
बॉलीवूडमधील सेलिब्रेटी ईडीच्या रडारवर
लिबियात हाहाःकार, महापुरामुळे २० हजार मृत्यू
‘भाजपाने एक नवीन विंग तयार केली आहे. या विंगच्या माध्यमातून दंगली घडवायच्या. २०२४ च्या निवडणुकीच्या आधी हा देश दंगलींमध्ये होरपळून टाकायचा आणि मग निवडणुकांना सामोरं जायचं किंवा निवडणुका पुढे ढकलायच्या अशा प्रकारचं यांचं धोरण दिसतं आहे’, अशी बिनबुडाची विधाने राऊत वारंवार करत असतात. जणू इंटेलिजन्स ब्युरो आणि रिसर्च एण्ड एनालिसिस विंगचे अधिकारी रोज पंतप्रधानांना बाजूला ठेवून रोज यांनाच रिपोर्टींग करतात की काय, अशा थाटात ते नवनवी माहीती उघड करत असतात. राऊत जे पत्रकारांसमोर बोलतात तेच त्यांचे मालक उद्धव ठाकरे उचलतात आणि सभांमध्ये बोलतात.
हिंदू विरोधाच्या भक्कम पायावर इंडी आघाडीचा डोलारा उभा आहे. द्रमुकचे मंत्री पोनमुडी यांनी तर हे जाहीरपणे सांगितलेले आहे की सनातन धर्म नष्ट करणे हे इंडी आघाडीचे मुख्य उद्दीष्ट आहे. त्यामुळे हिंदुंच्या मूळावर आलेले मामन खान असो वा ताहीर हुसैन सगळ्यांचा संबंध या आघाडीशी आहे.
ठाकरेंची परीस्थिती फार वाईट आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या काळात सामनामध्ये फक्त हिंदुस्तान हा शब्द वापरायचा असा दंडक होता. सामनाचे सगळे अग्रलेख आणि बातम्या काढून बघा हवं तर. तेच आता इंडीयासाठी गळे काढतायत. ज्वलंत हिंदुत्वाची व्यवस्थित घडी करून फडताळात ठेवल्यामुळे काँग्रेस, द्रमुक, आप, तृणमूल यांच्या सर्व हिंदूविरोधी कारवायांकडे दुर्लक्ष करणे ही त्यांची मजबूरी बनली आहे.
(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)