नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या ‘जवान’ चित्रपटात काँग्रेसशासित दहा वर्षांतील भ्रष्टाचार उघडकीस आणल्याचा दावा करत भाजपने बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरुख खानचे अभिनंदन केले आहे.
‘जवान चित्रपटाच्या माध्यमातून भारतातील सन २००४ ते २०१४ दरम्यानचा काँग्रेसची सत्ता असण्याच्या कालावधीतील भ्रष्टाचार उघड केल्याबद्दल शाहरुखचे आम्ही आभार मानतो,’ अशी प्रतिक्रिया भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते गौरव भाटिया यांनी दिली आहे. तसेच, त्यांनी या चित्रपटाचे पोस्टरही पोस्ट केले आहे. ‘या चित्रपटाने सर्व प्रेक्षकांना यूपीए सरकारच्या कार्यकाळातील दयनीय राजकीय भूतकाळाची आठवण करून दिली, असा दावा त्यांनी केला आहे.
तसेच, भाटिया यांनी सन २००९ ते २०१४ या यूपीएच्या कार्यकाळात झालेले कॉमनवेल्थ गेम्स, टूजी आणि कोळसा घोटाळा आदी घोटाळ्यांचा उल्लेखही केला आहे. ‘गेल्या साडेनऊ वर्षांत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये एकाही घोटाळ्याची नोंद झाली नाही,’ याकडे त्यांनी लक्ष वेधले आहे.
हे ही वाचा:
शौर्याला सलाम: जम्मू-काश्मीरमध्ये शहीद झालेल्या लष्करी अधिकाऱ्यांना श्रद्धांजली
दिल्लीतल्या ४५० पोलिसांना पंतप्रधानांकडून स्नेहभोजन
मोडतोड केलेला व्हीडिओ व्हायरल केल्याने मुख्यमंत्री संतापले
‘हम जवान है, अपनी जान हजार बार दावपर लगा सकते है, लेकिन सिर्फ देशके लिए, तुम्हारे जैसे देश बेचनेवालोंके लिए हरगिझ नही,’ हा चित्रपटातील संवाद गांधी कुटुंबाला तंतोतंत लागू पडते, असेही भाटिया यांनी नमूद केले आहे.
‘काँग्रेसच्या कार्यकाळात सुमारे एक लाख ६० हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केली होती. तर, एनडीए सरकारने पंतप्रधान किसान सन्मान निधी योजेनेंतर्गत किमान आधारभूत किमतीचे २.५५ लाख कोटी रुपये थेट ११ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यांत दिले,’ असा दावा त्यांनी केला.
काँग्रेसच्या सत्ताधाऱ्यांनी कर्ज बुडवणाऱ्यांना आणखी कर्ज दिले होते. कर्जबुडव्या विजय मल्ल्यानेही आधीचे कर्ज न भरताही आणखी कर्ज देणाऱ्या पंतप्रधान मनमोहन सिंग यांचे आभार मानले होते, याकडेही त्यांनी लक्ष वेधले. ‘शाहरुख तुझे आभार. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली या सर्व बाबी आता केवळ भूतकाळातच उरल्या आहेत,’असे सरतेशेवटी भाटिया यांनी नमूद केले आहे.