नाशिक शहरातील बांधकाम व्यावसायिक हेमंत पारीख यांच्या अपहरण प्रकरणी नाशिक पोलिसांनी राजस्थान मधून एका टोळीला अटक केली आहे. त्यांच्याकडून सुमारे १ कोटी रुपयांपेक्षा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे, अशी माहिती पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली.
नाशिक मध्ये इंदिरानगर परिसरात राहणारे बांधकाम व्यवसायिक हेमंत पारीख यांची अपहरण झाल्याची तक्रार २ सप्टेंबर रोजी इंदिरानगर पोलीस ठाण्यामध्ये दाखल करण्यात आली होती त्यानंतर या तपासाला गती देण्यात आली. पोलीस आयुक्त यांनी याबाबत मार्गदर्शन करत या टोळीचा छडा लावला आहे.
पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार, भारत सीमावर्ती भागात असलेल्या गावांमध्ये जाऊन नाशिक पोलिसांनी या आरोपींना अटक केली आहे. या सर्व प्रकरणांमध्ये नाशिक पोलिसांनी वाडीवरे जवळ असलेल्या बिकानेर ढाबा चालविणारा महेंद्र उर्फ रामनारायण बिष्णोई तसेच पिंटू राजपुत, रामचंद्र ओमप्रकाश बिष्णोई यांना अटक केली. तसेच अनिल खराटे हा इगतपुरी मध्ये वाडीवरे येथे राहत असून त्याला अटक करण्यात आली आहे.
७ सप्टेंबर २०२३ रोजी ताब्यात घेऊन त्यांच्याकडे गुन्हयाच्या अनुषंगाने विचारपूस केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. तसेच तपासात या गुन्ह्याचा मास्टर माईन्ड हा नाशिक शहरातील अनिल भोरु खराटे (वय २५ वर्ष) असल्याचे समोर आले. तसेच त्याने या गुन्ह्यातील मुख्य आरोपी महेंद्र बिष्णोई आणि त्याचे साथीदार यांच्या मदतीने या गुन्ह्याचा कट रचल्याचे आणि हेमंत पारीख यांच्या बाबत माहिती पुरविली होती, असे निष्पन्न झाल्याने त्यालाही तात्काळ ताब्यात घेऊन सदर गुन्हयामध्ये १० सप्टेंबर रोजी अटक करण्यात आली.
हे ही वाचा:
इसीसच्या पुणे मॉड्युलमधील फरार संशयितांवर प्रत्येकी ३ लाखाचे इनाम
हसवणारे ‘बिरबल’ काळाच्या पडद्याआड
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मोटार उत्पादकांना दिला हा सल्ला
पंतप्रधान मोदींच्या ‘मेक इन इंडिया’ धोरणाची पुतीन यांना भुरळ
आरोपींकडून खंडणी स्वरूपात मागितलेल्या रक्कमेपैकी १ कोटी ३३ लाख रोख रक्कम, गुन्ह्यात वापरलेली बोलेरो कॅप्मर गाडी, देशी बनावटीचा कटटा, सहा जिवंत राउंड असा ८ लाख ३२ हजार ५०० रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे. या गुन्ह्यातील चारही आरोपींना ८ सप्टेंबर रोजी अटक करण्यात आली असून त्यांना १५ सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे.