मराठा आरक्षणाच्या लढ्यात शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे गुरुजी उतरले. मराठा आरक्षणासाठी उपोषण करणारे मनोज जरांगे पाटील यांना त्यांनी पाठिंबा जाहीर केला. ‘शिवप्रतिष्ठान तुमच्या पाठीशी आहे’, अशी ग्वाही दिली. गुरुजींच्या या कृतीमुळे जादूची कांडी फिरली. जरांगे पाटील यांनीही उपोषण मागे घेण्याची तयारी दाखवली. मराठा आरक्षणाच्या निमित्ताने महाराष्ट्र पेटवण्याच्या तयारीत असलेल्या नेत्यांचा डाव भिडे गुरुजींनी तात्पुरता तरी उधळला आहे.
भिडे गुरुजींच्या मनात अचानक रात्री १२ च्या सुमारास जरांगेंना भेटण्याची इच्छा झाली. ते रातोरात प्रवास करून अंतरवाली सराटी येथे आंदोलनाच्या ठिकाणी पोहोचले. सकाळी त्यांनी जरांगेंची भेट घेतली. ही भेट अनपेक्षित होती. भुवया उंचावणारी होती. अनेकांच्या डोक्याला ताप निर्माण करणारी होती. कारण शिवप्रतिष्ठान म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज, हिंदवी स्वराज्याचे गड-किल्ले, महाराजांचा इतिहास याबाबत जागर करणारी संघटना. रायगडावर ३२ मण सोन्याचे सिंहासन बसवण्याचा संकल्प केला आहे, अशी संघटना. या संघटनेचे सर्वेसर्वा असलेले भिडे गुरुजी अचानक मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर जरांगे यांना पाठिंबा देतात, ही बाब विरोधकांच्या कल्पनेपलिकडची.
‘मुख्यमंत्री एकनाथ शिंदे लबाड नाहीत, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लुच्चे नाहीत, अजित पवार राष्ट्रवादीचे असले तरी हा काळीज असलेला नेता आहे’, असे भिडे गुरुजी म्हणाले. मराठा समाजाशी बेईमानी करणारे लुच्चे सध्या सत्तेत नाहीत, सत्तेत आहेत ते तुम्हाला न्याय देतील हा त्यांच्या शब्दांचा अर्थ होता. मराठा आंदोलन चिघळेल म्हणून देव पाण्यात घालून बसलेल्या अनेकांना पोटदुखी झाली. कारण डाव हातातून निसटणार याची त्यांना जाणीव झाली.
जरांगे आता मागे हटणार नाहीत, याबाबत आता मविआच्या नेत्यांची खात्री झालेली असताना हे घडले. शिउबाठाचे प्रवक्ते संजय राऊत यांनी तर असे ठाम विधान केले होते, ‘जरांगे आता मागे हटणार नाही याचा मला विश्वास आहे’. या विधानामागील नीयत लपलेली नाही. जरांगे यांची प्रकृती खालावली तर वातावरण चिघळेल आणि तापलेल्या तव्यावर आपल्याला रोट्या शेकता येतील याची विरोधी पक्षातील नेते वाट पाहतायत.
मराठ्यांना आरक्षण मिळाले तर त्याचे श्रेय शिंदे-फडणवीसांना मिळेल. हेच मविआच्या नेत्यांना नको आहे. त्यामुळे मराठा आंदोलनाचा विचका व्हावा, अशी अनेकांची इच्छा आहे. आतापर्यंत हे आंदोलन अत्यंत शिस्तबद्ध आणि शांततापूर्ण मार्गाने सुरू आहे. परंतु एकदा राजकीय वातावरण तापले की पेटायला वेळ लागत नाही. आंदोलनाशी काडीचाही संबंध नसलेल्यांना जाळपोळ आणि तोडफोडीसाठी उतरवण्यात येते. आंदोलनाला हिंसक वळण लागले की आंदोलन बदनाम होते आणि सत्ताधाऱ्यांनाही बदनाम करता येते. एका दगडात दोन पक्षी मारता येतात.
राऊत म्हणालेलेच होते, ‘मराठवाड्यातील कॅबिनेट बैठकीच्या आधी हे आंदोलन गुंडाळण्याची सरकारची तयारी आहे. कारण लोक रस्त्यावर उतरतील, गाड्या फोडतील हे त्यांना माहिती आहे’. राऊतांचे वक्तव्य म्हणजे उघड उघड चिथावणी होती. हे आंदोलन पेटावे, ठिकठिकाणी जाळपोळ व्हावी. पोलिसांना बळाचा वापर करण्याची वेळ यावी यासाठी देव पाण्यात घालून बसलेल्यांसाठी भिडे गुरुजींची भेट म्हणजे मोठे विघ्न बनले. भिडे-जरांगे यांची भेट झाली. दोघांची उत्तम चर्चा झाली. ‘तुम्हाला पाहिजे तसं आरक्षण तुम्हाला मिळाले पाहिजे, परंतु ही लढाई एक घाव दोन तुकडे अशा प्रकारची नाही, उपोषणा थांबवा, लढा थांबवू नका’, अशी सूचना भिडे गुरुजी यांनी जरांगे यांना केली.
‘राजकारणी आहेत म्हणून बिचकू नका जो शब्द देतील तो पूर्ण कऱण्याची जबाबदारी माझ्यावर सोडा’, हा शब्द भिडे गुरुजी यांनी जरांगेना दिलेला आहे. यावेळी त्यांच्या सोबत सांदीपान भुमरे आणि अर्जुन खोतकर हे महायुती सरकारचे मंत्रीही होते. त्यांच्या समोर हे गुरुजींनी हे आश्वासन दिलेले आहे.‘ मराठा समाज हा हिदुंस्तानच्या पाठीचा कणा आहे. तुम्ही करतायत ती धर्माची समाजसेवा आहे. तुमच्या तपश्चर्येला फळ निश्चित मिळेल’, असा दिलासा गुरुजींनी दिला. जरांगे यांचा प्रतिसादही सत्कात्मक होता. ‘मी खचलो होतो, परंतु तुम्ही मला ऊर्जा दिली’, अशा भावना त्यांनी गुरुजींकडे व्यक्त केल्या. या भेटीनंतर काही वेळाने उपोषण मागे घेण्याचे सुतोवाच केले, परंतु आंदोलन सुरू ठेवणार असे त्यांनी स्पष्ट केले. गुरुजींचा सल्ला त्यांनी मानला.
हे ही वाचा:
शेवटी कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन झाले भारतातून जस्ट आऊट
पवार कुणबी व्हायला तयार आहेत का?
‘जवान’ चित्रपट पाहताना अनुपम खेर यांनी मारल्या शिट्ट्या
उत्तर प्रदेशातील २४० मदरशांची मान्यता होणार रद्द
शिवछत्रपती हा एकमेव घ्यास घेऊन जगणारे भिडे गुरुजी हे कुणी राजकारणी नाहीत. त्यांना वैयक्तिक महत्वाकांक्षा नाही. अशा वयोवृद्ध माणसाने अत्यंत विनम्रपणे जरांगे पाटलांकडे शब्द टाकला आहे. जरांगे पाटलांनी त्याला मान दिला.
उपोषण मागे घेण्यासाठी त्यांनी पाच मागण्या केल्या आहेत. तीस दिवसांची मुदत देतो. ३१ व्या दिवशी आरक्षण मिळालेच पाहिजे अशी त्यांची मागणी आहे. जे गेल्या चाळीस वर्षांत झाले नाही ते ३० दिवसात महायुती सरकारने घडवावे, अशी त्यांची इच्छा आहे. उपोषण सोडण्याच्या वेळी सर्व मंत्रिमंडळ इथे हजर राहिले पाहीजे अशी मागणीही त्यांनी केली आहे. या मागणीला मात्र अहंकाराचा वास आहे.
मविआच्या काळात झालेले जरांगे पाटील यांचे उपोषण आम्ही यशस्वीरीत्या सोडवलं, होते असे विधान राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी केलेले आहे. त्याचवेळी आरक्षणाचा प्रश्नही सुटला असता तर बरे झाले असते. परंतु तसे घडले नाही. हा प्रश्न देवेंद्र फडणवीस सत्तेत येईपर्यंत भिजत ठेवण्यात आला. भिडे गुरुजींच्या प्रयत्नांमुळे हा गुंता सुटण्याची चिन्ह निर्माण झाली आहेत. त्यांनी फक्त मराठा आरक्षणाला पाठींबा दिलेला नाही तर सरकारने दिलेला शब्द पूर्ण केला जाईल याची जबाबदारीही घेतली आहे. गुरुजींनी मविआच्या नेत्यांना दणका दिलेला आहे.
(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)