मोरोक्कोत गेल्या सहा दशकांतील सर्वांत मोठा भूकंप झाल्याने गुण्यागोविंदाने राहणारे १०० जणांच्या कुटुंबांचे ‘तिख्त’ हे गाव भुईसपाट झाले. या गावात जिकडे पाहावे तिकडे लाकडे, ढासळलेल्या भिंतींचे ढिगारे, तुटलेली भांडी आणि मोडलेल्या वस्तू दिसत आहेत. मोरोक्कोमध्ये ठिकठिकाणी भूकंपाच्या खुणा दिसत आहेत. रुग्णालयाबाहेर प्रेते पडली आहेत. तर, बचावलेले लोक या ढिगाऱ्यात आपल्या उपयोगी वस्तूंचा शोध घेत आहेत. या भूकंपामुळे अनेक गावे केवळ ढिगारे झाली आहेत. याच गावातील एका महिलेचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. तेव्हा तिच्या २५ वर्षीय प्रियकराने तिचा मृतदेह दफन करून तिला साश्रू नयनांनी निरोप दिला.
मोरोक्कोमध्ये शुक्रवारी रात्री उशिरा भूकंपाचे जोरदार धक्के बसले. जेव्हा धक्के बसण्यास सुरुवात झाली, तेव्हा तो तिच्याशी फोनवर गप्पा मारत होता. आणि त्यांचा फोन कट होण्याआधी जमिनीवर भांडी पडल्याचा आवाज आला. त्याला कळून चुकले की ती आता जिवंत नाही. उमरचा काही दिवसांतच मीना ऐत बिही हिच्याशी विवाह होणार होता. परंतु त्याच्यासमोरच तिचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. मीनाला एका चादरीत गुंडाळून स्मशानभूमीत नेण्यात आले. तिथे याआधीच ६८ जणांना दफन करण्यात आले आहे. ढिगाऱ्यातून मीना हिचा मोबाइल सापडला होता, तो उमरकडे सुपूर्द करण्यात आला. ‘हे गाव मृत्युमुखी पडले आहे. येथील जीवन संपुष्टात आले आहे,’ अशी प्रतिक्रिया ३३ वर्षीय महिलेने दिली.
हे ही वाचा:
उत्तर प्रदेशातील २४० मदरशांची मान्यता होणार रद्द
‘इनकी जी-२० समिट’ या वक्तव्याबद्दल प्रियांका वड्रांवर शेहजाद पूनावालांची टीका
बारसू रिफायनरी प्रकल्पावर लक्ष ठेवण्यासाठी समिती
बायडेन यांच्या हॉटेलचे नाव ‘पंडोरा’, सुनक यांचे ‘समारा’
हसतेखेळते गाव भुईसपाट झाल्यामुळे या गावात आता स्मशानशांतता पसरली आहे. २३ वर्षीय अब्दल रेहमानने तर त्याच्या कुटुंबातील बहुतेक लोकांना गमावले आहे. भूकंपाचा धक्का बसला तेव्हा तो जेवून शतपावली करण्यासाठी बाहेर पडला होता. त्यानंतर भूकंपाचा जोरदार धक्का बसला. लोक स्वत:च्या घरातून कसेबसे बाहेर पडण्याचा प्रयत्न करत होते. त्याच्या वडिलांचाही यात मृत्यू झाला.
मोरोक्कोमधील मृतांची संख्या दोन हजार १२२वर पोहोचली आहे. सर्वाधिक एक हजार २९३ मृत्यू अल हाऊस प्रांतात झाले आहेत. तर, दोन हजार ५९ जण जखमी आहेत. त्यातील एक हजार ४०४ जणांची प्रकृती अद्यापही चिंताजनक आहे.