छत्रपती शिवाजी महाराजांनी सन १६५९ मध्ये विजापूरचा सेनापती अफझल खान याचा ज्या शस्त्राने कोथळा बाहेर काढला होता, ती वाघनखे लवकरच महाराष्ट्रात परत येणार आहेत. ही वाघनखे परत करण्यास ब्रिटनने सहमती दर्शवली आहे. राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार या महिन्याच्या अखेरीस लंडनला भेट देऊन या संदर्भातील सामंजस्य करारावर स्वाक्षरी करणार आहेत. ही वाघनखे सध्या ‘व्हिक्टोरिया आणि अल्बर्ट संग्रहालय’ येथील प्रदर्शनात आहेत. जर सर्व काही ठरल्याप्रमाणे झाले, तर या वर्षीच ही सुप्रसिद्ध वाघनखे महाराष्ट्रात परत येऊ शकतील.
‘ब्रिटनच्या अधिकाऱ्यांनी आम्हाला पत्र पाठवून वाघनखे परत देण्याचे मान्य केले आहे. हिंदू कालगणनेनुसार, छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या दिवशी अफझलखानाचा वध केला, त्या घटनेच्या वर्धापन दिनानिमित्त आम्ही ते परत मिळवू शकतो,’ असा विश्वास मुनगंटीवार यांनी व्यक्त केला आहे.
वाघनखे परत मिळवण्यासाठी राज्य सरकारचे सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या नेतृत्वाखालील त्रिसदस्यीय पथक ब्रिटनला जाणार आहे. ‘वाघनखे परत आणण्याचे सोपस्कार पूर्ण केले जात आहेत. सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्याव्यतिरिक्त, आम्ही शिवाजीची जगदंबा तलवार यांसारख्या इतर वस्तू पुन्हा मिळवण्याचाही प्रयत्न करू. वाघनखे महाराष्ट्रात परत येत आहेत, हे महाराष्ट्रासाठी आणि तेथील जनतेसाठी मोठी कामगिरी आहे.
अफझलखानाच्या वधाची तारीख ग्रेगोरियन कालगणनेप्रमाणे १० नोव्हेंबर आहे. परंतु आम्ही हिंदू तिथी दिनदर्शिकेवर आधारित तारीख ठरवत आहोत,’ असे मुनगंटीवार यांनी सांगितले. छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखे हा इतिहासाचा अमूल्य ठेवा असून त्यांच्याशी राज्यातील जनतेच्या भावना निगडीत आहेत. त्यामुळे त्याचे हस्तांतरण वैयक्तिक जबाबदारीने आणि काळजीपूर्वक केले पाहिजे. यासाठी मुनगंटीवार यांच्यासह सांस्कृतिक मंत्रालयाचे प्रधान सचिव डॉ. विकास खारगे आणि राज्याच्या पुरातत्व व वस्तुसंग्रहालय संचालनालयाचे संचालक डॉ. तेजस गर्गे हे लंडनमधील व्ही अँड ए आणि इतर संग्रहालयांना भेट देतील,’ असा सरकारी ठराव सांस्कृतिक कार्य विभागाने जारी केला आहे.
२९ सप्टेंबर ते ४ ऑक्टोबर असा सहा दिवसांचा हा दौरा असेल. तीन सदस्यीय शिष्टमंडळाच्या या दौऱ्यासाठी राज्य सरकार सुमारे ५० लाख रुपये खर्च करणार आहे.
हे ही वाचा:
मोबाईल न दिल्यानं तरुणाची हत्या !
१८ सप्टेंबरला काय होणार? धक्कातंत्राचा विरोधकांना धसका
शाहरूखच्या ‘जवान’ चित्रपटामुळे चाहत्यांमध्ये जल्लोष
या वर्षी एप्रिल महिन्यात मुनगंटीवार यांनी जगदंबा तलवार आणि वाघनखे महाराष्ट्राला परत मिळावीत, यासाठी पश्चिम भारताचे तत्कालीन ब्रिटिश उपउच्चायुक्त ऍलन गेमेल आणि राजकीय आणि द्विपक्षीय व्यवहार विभागाचे उपप्रमुख इमोजेन स्टोन यांची भेट घेतली होती.