अभिनेता शाहरुख खान याचा बहुप्रतीक्षित असा ‘जवान’ चित्रपट ७ सप्टेंबर रोजी हिंदी, तमिळ आणि तेलुगू भाषेत जगभरात प्रदर्शित झाला असून चाहत्यांच्या आनंदाला उधाण आले आहे. या चित्रपटात शाहरुख खानसोबत विजय सेतूपती, नयनतारा, सान्या मल्होत्रा आणि प्रियमणी यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. या चित्रपटात दीपिका पडुकोण देखील पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात शाहरुख खान दुहेरी भूमिकेत दिसणार आहे. गुप्तचर अधिकारी आणि चोर अशा दोन भूमिकांमध्ये शाहरुख दिसेल.
या चित्रपटाचे शूटिंग पुणे, मुंबई, हैदराबाद, चेन्नई, राजस्थान आणि औरंगाबाद येथे झाले आहे. ‘जवान’ हा चित्रपट अटली या दिग्दर्शकाचा पहिला हिंदी चित्रपट आहे. ‘रेड चिलीज एन्टरटेन्मेंट’ प्रोडक्शन अंतर्गत गौरी खान आणि गौरव वर्मा यांनी या चित्रपटाची निर्मिती केली असून या चित्रपटामुळे देशभरातील शाह रुखच्या चाहत्यांच्या आनंदाला उधाण आले आहे.
हे ही वाचा:
१८ सप्टेंबरला काय होणार? धक्कातंत्राचा विरोधकांना धसका
महाडला २०० खाटांचे रुग्णालय उभारा
सुधीर मोरे आत्महत्या प्रकरणी माजी आमदारांच्या मुलीला अटक
वांद्रे येथील गेइटी चित्रपटगृहात गुरुवारी सकाळी जन्माष्टमी आणि जवान चित्रपटाच्या प्रदर्शनानिमित्त दहीहंडी उभारण्यात आली होती. चाहत्यांनी चित्रपटगृहाबाहेर फटाकेही फोडले. कोलकाता येथील मिरेज चित्रपटगृहात चित्रपट सुरू झाल्याच क्षणी चाहत्यांच्या उत्साहाला उधाण आले होते. चित्रपटगृहात चाहत्यांनी शाह रुखच्या पोस्टरची पूजा केली. तसेच, ते शाह रुखचा जयघोष करत होते. बंगळुरूच्या उर्वशी चित्रपटगृहात फ्लॅश मॉब करण्यात आला होता. बंगळुरूच्या चित्रपटगृहाबाहेर चाहत्यांनी ‘जवान’ चित्रपटातील ‘नॉट रमय्या वस्तावया’ या गाण्यावर फ्लॅश मॉब केला. हैदराबादच्या देवी चित्रपटगृहातही चाहते खूष दिसत होते.
चाहत्यांचे हे प्रेम पाहून शाहरुखही भारावला होता. त्याने ‘एक्स’वर चाहत्यांचा व्हिडीओ पोस्ट करून त्यांचे आभार मानले आहेत. एका चित्रपटगृहाबाहेर तर चाहते ढोल घेऊन आले होते. एक चाहता तर शाह रुख खानचे जवान चित्रपटातील व्यक्तिरेखेच्या रूपात आला होता. त्याने लाल शर्ट परिधान करून स्वत:च्या डोक्याभोवती बँडेज गुंडाळले होते. या वेशभूषेसाठी त्याला सात ते आठ दिवस लागल्याचे त्याने सांगितले. हैदराबादच्या चित्रपटगृहाबाहेरही चाहत्यांनी फटाके वाजवून चित्रपटाचे स्वागत केले. तर, काही जणांनी मुंबईतील गेइटी चित्रपटगृहातच नृत्य करण्यास सुरुवात केली. चित्रपटात ‘झिंदा बंदा’ गाणे सुरू होताच अनेक चाहत्यांनी गाण्यावर ताल धरला.