राष्ट्रपती द्रौपदी मूर्मू यांच्याद्वारे जी २० शिखर परिषदेचे भोजन समारंभाच्या आमंत्रण पत्रिकेवर ‘प्रेसिडेन्ट ऑफ इंडिया’ऐवजी ‘प्रेसिडेन्ट ऑफ भारत’ लिहिल्यामुळे एकच गदारोळ माजला आहे.
तसेच, २०व्या आसियान-भारत शिखर परिषद आणि १८व्या पूर्व आशिया शिखर परिषदेसाठी भारताच्या पंतप्रधानांच्या इंडोनेशिया यात्रेशी संबंधित एका सरकारी बुकलेटमध्ये त्यांचे नाव ‘भारताचे पंतप्रधान’ असे लिहिण्यात आले आहे. भाजप प्रवक्ते संबित पात्रा यांनी याचे छायाचित्र ट्वीट केले आहे. मात्र केंद्रीय सूचना व प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी देशाचे नाव बदलले जात असल्याच्या सर्व अटकळी फेटाळून लावल्या आहेत.
‘मला वाटते ही सर्व एक अफवा आहे. मला केवळ इतकेच म्हणायचे आहे की, ज्या कोणाला भारत या शब्दावर आक्षेप आहे, त्याची मानसिकताच यातून व्यक्त होत आहे,’ अशी टीका ठाकूर यांनी केली आहे. तसेच, राष्ट्रपतींनी पाठवलेल्या निमंत्रण पत्रिकेबाबत बोलताना ‘राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या भारताच्या राष्ट्रपती आहेत. त्यामुळे तसे लिहिल्यास काय चुकले?’, अशी विचारणाही त्यांनी केली आहे.
हे ही वाचा:
सनातन धर्माबद्दल टिप्पणी प्रकरणी उदयनिधी स्टॅलिन, प्रियांक खर्गेंविरोधात गुन्हा
किशोरी पेडणेकर यांना अटक होणार? आर्थिक गुन्हे शाखेने ११ तारखेला बोलावले
कु्त्रा चावल्यानंतर त्याला पाणी, वाऱ्याची भीती वाटू लागली आणि…
इंडिया आघाडीच्या पुढील बैठकांना पूर्णविराम; संजय राऊतांनी सांगितले कारण
‘मी भारत सरकारमध्ये मंत्री आहे. त्यात नवीन काही नाही. जी २० २०२३च्या ब्रँडिंग लोगोवर भारत आणि इंडिया हे दोन्ही शब्द लिहिले आहेत. मग भारत नावावरच आक्षेप का? भारत या शब्दावर कोणाला का आक्षेप आहे? यावरून स्पष्टच कळून चुकते की, ‘इंडिया’ ही आघाडी भारताच्या विरोधात आहे. हे विरोधी नेते परदेशात जातात तेव्हा भारताची निंदानालस्ती करतात. जेव्हा ते भारतात असतात तेव्हा त्यांना भारत या नावावर आक्षेप असतो,’ अशी टीका ठाकूर यांनी केली.