भारतात पहिल्यांदाच होणाऱ्या जी २० परिषदेच्या निमित्ताने प्रकाशित केलेल्या दोन पुस्तिकांमध्ये केंद्र सरकारने रामायण, महाभारताचा हवाला देऊन ‘भारत – लोकशाहीची’ जननी असा उल्लेख केला आहे. ‘इंडिया-भारत’ नावावरून उठलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर सरकारने मंगळवारी जी २० शिखर परिषदेपूर्वी दोन पुस्तिका प्रसिद्ध केल्या. त्यापैकी एकाला ‘भारत, लोकशाहीची जननी’ असे शीर्षक दिले आहे. मान्यवरांना सुपूर्द करण्यात येणार्या या पुस्तिकेत ‘भारत हे देशाचे अधिकृत नाव आहे’ आणि ‘राज्यघटनेत व १९४६ ते ४८ दरम्यान झालेल्या चर्चेत याचा उल्लेख आहे,’ असे वर्णन केले आहे.
या पुस्तिकेत २६ पृष्ठे असून त्यात भारत म्हणजेच ‘इंडिया’च्या राज्यकारभारात लोकांची संमती मिळवणे हा इतिहासाच्या प्राचीन काळापासून जीवनाचा एक भाग आहे. प्राचीन काळापासून ते आजपर्यंतच्या काळातील ‘भारतातील लोकशाही आचारसंहितेचा’ तपशील, धर्म, स्तोत्रे आणि रामायण आणि महाभारत यांसारख्या महाकाव्यांच्या उल्लेखासह करण्यात आला आहे. बहुविध विचार ठेवण्याचे स्वातंत्र्य, स्वीकारार्हता, समानता, लोकांच्या कल्याणासाठी शासन आणि समाजात सर्वसमावेशकता या सर्वांमुळे सर्वसामान्य नागरिकांना सन्माननीय जीवन जगता येते,’ असे या पुस्तिकेत म्हटले आहे.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी जी २० परिषदेच्या भोजन समारंभाच्या निमंत्रणपत्रिकेत ‘प्रेसिडन्ट ऑफ इंडिया’ असा उल्लेख आहे. त्यामुळे वाद निर्माण झाला आहे. संसदेच्या आगामी विशेष अधिवेशनात भारताचे नाव बदलण्याचा सरकारचा विचार आहे का, याबाबत चर्चा सुरू आहे.
‘भारत’ पुस्तिकेत काय आहे?
पुस्तिकेत आत्मविश्वास, स्वातंत्र्य आणि मुक्ती यांचे प्रतीक असलेल्या नृत्य करणाऱ्या मुलीचा पाच हजार वर्षे जुन्या ब्राँझ पुतळ्याचे छायाचित्र आहे. यात चार वेदांपैकी एक असलेल्या ऋग्वेदातील एका स्तोत्राचाही समावेश आहे. या पुस्तिकेत रामायण आणि महाभारताच्या माध्यमातून लोकशाही घटकांची उदाहरणे विशद करण्यात आली आहेत. रामायणात, भगवान रामाची राजा म्हणून निवड केली गेली, तेव्हा त्यांचे वडील दशरथ यांनी त्यांच्या मंत्रिमंडळाची आणि लोकांची संमती मागितली होती. महाभारतात, मरणासन्न भीष्म यांनी युधिष्ठिराला सुशासनाची शिकवण दिली आणि सुरक्षिततेचे महत्त्व अधोरेखित केले, असे या पुस्तिकेत नमूद करण्यात आले आहे. या पुस्तिकेत बौद्ध धर्माच्या आगमनाविषयीही लिहिले आहे.
हे ही वाचा:
कु्त्रा चावल्यानंतर त्याला पाणी, वाऱ्याची भीती वाटू लागली आणि…
सोमय्या प्रकरणी ‘लोकशाही’चे कमलेश सुतार यांच्यावर गुन्हा
आदीत्य ठाकरे आता स्टॅलिनलाही मिठी मारा…
नऊ महिन्यांच्या मुलीच्या पोटात आढळले बाळ !
चंद्रगुप्त मौर्य आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासह अनेक राजांनी भारताच्या लोकशाही आचारसंहितेला आकार देण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती, ही बाबही येथे मांडण्यात आली आहे. तसेच, भारतीय राज्यघटना आणि त्याचे ऐतिहासिक महत्त्व याबद्दलही यात नमूद करण्यात आले आहे. ‘भारताच्या राज्यघटनेने आपल्या समृद्ध इतिहासातील भूतकाळातील लोकशाही प्रारूपाचे पैलू जपून आधुनिक, लोकशाही प्रजासत्ताकाची रूपरेषा दिली आहे,” असे त्यात म्हटले आहे.
‘इलेक्शन्स ऑफ इंडिया’ विषयावर पुस्तिका
सरकारने ‘इलेक्शन्स ऑफ इंडिया’ या विषयावर १५ पृष्ठांची आणखी एक पुस्तिका प्रसिद्ध केली. या पुस्तिकेत १९५२ ते २०१९ या कालावधीतील भारतातील सार्वत्रिक निवडणुकांचा तपशीलवार इतिहास आहे. यात राजकीय पक्षांच्या संख्येसह प्रत्येक निवडणुकीत झालेल्या प्रगतीची माहिती दिली आहे. मतदारांची संख्या, महिलांचा सहभाग आणि भारतीय निवडणूक आयोगाची स्थापना याबाबत नमूद करण्यात आले आहे. या पुस्तिकेत मात्र ‘भारत’ नावाचा कुठेही उल्लेख नाही.