भाजपा नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांच्या आक्षेपार्ह व्हायरल व्हिडिओ प्रकरणी महत्त्वाची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. लोकशाही मराठीचे मुख्य संपादक कमलेश सुतार आणि अनिल थत्ते यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी किरीट सोमय्या यांनी खाजगी वृत्तवाहिनी आणि अनिल थत्ते यांच्या विरोधात तक्रार दिली होती.
किरीट सोमय्या यांच्या तक्रारीनंतर उत्तर प्रादेशिक सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला. भारतीय दंड संहितेच्या कलम ५०० (मानहानी) आणि माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम ६६ (ई) आणि ६७ (ए) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सायबर पोलिस उपायुक्त यांच्या देखरेखीखाली पूर्व सायबर पोलिस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, मंगळवार, ६ सप्टेंबर रोजी सोमय्या यांचा जबाब नोंदवण्यात आला होता.
व्हायरल व्हिडिओबाबत किरीट सोमय्या यांनी तक्रार केल्यानंतर या प्रकरणाची चौकशी सुरू करण्यात आली होती. त्यानुसार मुंबई गुन्हे शाखेकडे तपास सोपवण्यात आला आणि सायबर पोलिसांनी तपास हाती घेतला. मंगळवारी किरीट सोमय्या यांनी आपले जबाब दिल्यानंतर या प्रकरणाची प्रक्रिया सुरू करण्यात आली आणि रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भाजपा नेते किरीट सोमय्या यांचा एक आक्षेपार्ह व्हिडिओ काही दिवसांपूर्वी व्हायरल झाला होता. या प्रकरणाचा तपास करणाऱ्या गुन्हे शाखेने तपासादरम्यान जे काही आढळून आले त्या आधारे हा व्हिडिओ खरा असल्याचा दावा केला आहे. यात कोणत्याही प्रकारे छेडछाड किंवा मॉर्फ केलेले नसल्याचे गुन्हे शाखेने सांगितले होते. मात्र, हा व्हिडीओ खरा नसल्याचा दावा किरीट सोमय्या यांनी केला आहे. राज्याच्या पावसाळी अधिवेशनातही हा मुद्दा गाजला होता.
हे ही वाचा:
राणे-कीर्तिकरांवर चिडून ठाकरेंनी काढले वड्याचे तेल वांग्यावर…
सौरव गांगुलीच्या चरित्रपटामध्ये रणबीरऐवजी आयुष्मान?
नेपाळला पराभूत करत भारताची सुपर ४ मध्ये धडक
सेहवाग म्हणतो, जर्सीवर ‘इंडिया’ नव्हे ‘भारत’ नाव असावं
व्हिडिओ प्रकरण समोर आल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले होते. यानंतर, मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पथकाने संपूर्ण व्हिडिओचे बारकाईने विश्लेषण केले आणि व्हिडिओ मॉर्फ केलेला नसल्याचे आढळून आले होते. ‘लोकशाही’ या वृत्तवाहिनीने भाजप नेते सोमय्या यांची आक्षेपार्ह व्हिडिओ प्रसारित केला. मराठी वृत्तवाहिनीनेही त्यांच्याकडे असेच आणखी व्हिडिओ असल्याचा दावा केला होता. गुन्हे शाखेने त्या वृत्तवाहिनीला पत्र लिहून त्या व्हिडिओंची मागणी केली होती, जेणेकरून तपास करता येईल.