ओमान येथे झालेल्या पुरुषांच्या हॉकी ५ आशिया कप या पहिल्यावहिल्या स्पर्धेत भारताने दमदार कामगिरी करत विजेतेपद मिळविले. ओमान येथे २०२४मध्ये होत असलेल्या याच प्रकाराच्या जागतिक स्पर्धेसाठी ही पात्रता स्पर्धा होती. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय संघाचे या कामगिरीबद्दल कौतुक केले आहे.
एकीकडे भारत आणि पाकिस्तान यांच्यातील आशियाई क्रिकेट स्पर्धेतील सामन्याकडे सर्वांचे लक्ष होते पण पावसामुळे हा सामनाच रद्द झाला. मात्र आशिया चषक हॉकी ५ स्पर्धेत भारताने अंतिम फेरीत पाकिस्तानला ४-४ अशा बरोबरीनंतर पेनल्टी शूटआऊटमध्ये २-० असे पराभूत केले आणि विजेतेपदावर नाव कोरले.
भारतातर्फे मोहम्मद राहील (१९ व २६वे मिनिट), जुगराज सिंग (७ वे मिनिट), मणिंदर सिंग (१० वे मिनिट) यांनी गोल केले. तर शूटआऊटमध्ये गुरज्योतसिंग व मणिंदर सिंग यांनी गोल नोंदवत भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. पाकिस्तानच्या वतीने अब्दुल रेहमान (५ वे मिनिट), कर्णधार अब्दुल राणा (१३ वे मिनिट), झिकरिया हयात (१४वे मिनिट) आणि अर्शद लियाकत (१९वे मिनिट) यांनी गोल केले.
हे ही वाचा:
मराठा आरक्षण आंदोलक पवारांवर नाराज का झाले?
राष्ट्रवादीने उद्धव ठाकरेंकडे अडीच वर्षे मुख्यमंत्रीपद मागितले होते, पण…
भारतातील नव्या वातावरणामुळे चित्त्यांचे मृत्यू !
धर्मांतर कराल तर सावधान… शासकीय लाभ मिळणार नाहीत
भारतीय संघाच्या या कामगिरीबद्दल हॉकी इंडियाने भारतीय संघातील प्रत्येक खेळाडूसाठी २ लाखांचे इनाम जाहीर केले तर सपोर्ट स्टाफसाठी प्रत्येकी १ लाख जाहीर केले. हॉकी इंडियाचे अध्यक्ष व माजी हॉकीपटू दिलीप तिर्की यांनी भारतीय संघाचे कौतुक केले. ते म्हणाले की, ओमान येथे केलेल्या कामगिरीबद्दल भारतीय संघाचे कौतुक. भारतीय संघाने अष्टपैलू कामगिरीचे प्रदर्शन केले. गेले काही महिने जी मेहनत घेतली त्याचे फळ भारतीय संघाला मिळाले. ओमानमध्येच पुढील वर्षी होत असलेल्या वर्ल्डकपसाठी भारतीय संघाला खूप शुभेच्छा.
पंतप्रधानांकडून अभिनंदन पुरुषांच्या हॉकी ५ आशिया चषक स्पर्धेचे विजेतेपद पटकावल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय पुरुष हॉकी संघाचे अभिनंदन केले आहे. पंतप्रधानांनी एक्स वर पोस्ट केले आहे; “हॉकी ५ आशिया चषक स्पर्धेचे विजेते! ! भारतीय पुरुष हॉकी संघांचे एका अविस्मरणीय विजयाबद्दल अभिनंदन. हा विजय म्हणजे आपल्या खेळाडूंचा दृढनिश्चय आणि समर्पित वृत्तीचा दाखला आहे. या विजयामुळे पुढल्या वर्षी ओमानमध्ये होणाऱ्या हॉकी5 विश्वचषकासाठी देखील आपण पात्र ठरलो आहोत. आपल्या खेळाडूंचे धैर्य आणि निर्धार आपल्या देशाला प्रेरित करत राहील.”