हल्लीची बहुतेक मुले इंटरनेटच्या, ऑनलाइन गेम्सच्या आहारी गेली असताना अनेक दुर्गम भागांतील मुलांना ही अद्ययावत साधने सोडाच, साधे पुस्तकही वाचायला मिळणे ही अशक्यप्राय गोष्ट असते. कारण त्यांच्यापर्यंत पोहोचणारी वाटच खडतर असल्याने पुस्तकांनीही त्यांच्याकडे पाठ फिरवलेली असते. मात्र उत्तराखंडच्या दुर्गम टेकड्यांवरील गावांत राहणारी मुले तुलनेने अधिक सुदैवी ठरली आहेत. एक चालतीबोलती ‘घोडा लायब्ररी’च येथील कुमाऊ गावच्या मुलांपर्यंत पोहोचली असून तो आणत असलेल्या पुस्तकासंह हा चार पायांचा ग्रंथपालही मुलांना आवडूही लागला आहे.
नैनितालचे रहिवासी २९ वर्षीय शुभम बधानी यांनी हा उपक्रम सुरू केला आहे. ते स्वत: प्रशिक्षित ग्रंथपाल आहेत. हा उपक्रम हळूहळू लोकप्रिय होत आहे. तसेच, मुलांमध्ये वाचनाची गोडी निर्माण व्हावी, यासाठी अनेकांनी या प्रकल्पात रस दाखवला आहे. यापैकी काही मुले गरीब आणि वंचित आहेत. या मुलांपर्यंत पुस्तके पोहोचावी, त्यांना वाचनाची गोडी वाटावी, अशी शुभम बधानी यांची इच्छा होती. आणि ‘इच्छा तेथे मार्ग’ या तत्त्वानुसार, त्यांना यावर तोडगा सापडला. ‘मी विचार केला, घोड्यावर फिरणारी लायब्ररी का करू नये?’ आणि त्यांनी हा विचार तडीस नेला. स्थानिकांनी लगेचच ही कल्पना उचलून धरली आणि त्यांना घोडे देऊ केले. ‘आमचे स्वयंसेवक पुस्तकांचे वितरण करतात आणि वाचनसत्र आयोजित करतात,’ असे बधानी यांनी सांगितले.
घोड्यांचा प्रश्न सुटल्याने, दोन स्वयंसेवी संस्था ‘हिमोत्थान’ आणि ‘संकल्प युथ फाऊंडेशन’ यांनी पुस्तके आणि निधीची जबाबदारी स्वीकारली. संस्थेचे स्वयंसेवक गावोगावी जाऊन वाचू इच्छिणाऱ्या मुलांपर्यंत पोहोचतात आणि त्यांना पुस्तके देतात. ही पुस्तके त्यांना आठवडाभर ठेवण्याची मुभा असते. त्यानंतर पुस्तके गोळा करण्यासाठी ते दुसरी फेरी काढतात आणि त्यांना नवीन पुस्तके देतात. ‘अशा प्रकारे आम्ही आमच्याकडच्या मर्यादित पुस्तकांसह विस्तृत क्षेत्र व्यापू शकत आहोत. मात्र यासाठी आम्हाला देणग्यांची आवश्यकता आहे. आमच्या मोहिमेला निधी मिळावा, यासाठी आम्ही गुंतवणूकदार शोधत आहोत,’ असे एका स्वयंसेवकाने सांगितले.
हे ही वाचा:
आजारी बिबट्यासोबत ‘सेल्फी’; त्याच्या पाठीवर स्वार होण्याचा प्रयत्न
८० टक्के भारतीय म्हणतात पुन्हा मोदीच!
जी२० च्या पाहुण्यांना त्रास नको म्हणून दिल्लीत लंगूरचे कटआऊट !
चेंबूरमध्ये १७ वर्षाच्या मुलाची हत्या करून तुकडे घरात ठेवले
‘सध्या आमच्याकडे केवळ १५ वर्षांपर्यंतच्या मुलांसाठी पुस्तके आहेत. एकदा का आम्हाला निधी मिळू लागला की, आम्ही आमचे वितरण क्षेत्र वाढवू आणि सर्व वयोगटांसाठी पुस्तके मिळवू, असा आशावाद त्यांनी व्यक्त केली. या प्रयत्नांना आणखी आनंद देणारी गोष्ट म्हणजे गावातील महिलांनी अभ्यासात दाखवलेली उत्सुकता. “अनेक कारणांमुळे, त्यांना शिक्षणापासून जवळजवळ वंचित ठेवण्यात आले आहे. या महिलादेखील आमच्या उपक्रमात सहभागी होत आहेत. आम्ही त्यांना प्रोत्साहन देत आहोत,’ असे बधानी म्हणाले. या उपक्रमामुळे गावकऱ्यांनीही कृतज्ञतेची भावना व्यक्त केली आहे. “आम्ही सर्वजण वाचन सत्रात भाग घेतो. त्यामुळे आम्हाला ज्ञान मिळविण्यात मदत होते. यासाठी आम्ही आमचे काम लवकर संपवतो,’ असे तल्ला जालना येथील रहिवासी ३२ वर्षीय नथू राम यांनी सांगितले.