रशियातील विमान दुर्घटनेमध्ये मृत्युमुखी पडलेल्या १० जणांमध्ये ‘व्हॅगनर’ या भाडोत्री सैनिकांचे प्रमुख येवगेनी प्रिगोझिन हेदेखील होते, यावर रशियाच्या चौकशी समितीने शिक्कामोर्तब केले आहे. विमान अपघातात घटनास्थळावर सापडलेल्या १० मृतदेहांची फोरेन्सिक आणि डीएनए चाचणी करण्यात आली आहे, अशी माहिती समितीच्या प्रवक्त्या स्वेतलाना पेट्रेंका यांनी रविवारी दिली. मात्र त्यांनी या अपघाताचे कारण स्पष्ट केले नाही.
६२ वर्षीय प्रिगोझिन आणि त्यांचे काही प्रमुख लेफ्टनंट यांचा समावेश दुर्घटनाग्रस्त विमानातील प्रवासी आणि चालकांच्या यादीत होता. मॉस्को आणि सेंट पीटर्सबर्ग या दरम्यान या विमानाचा अपघात झाला. तेव्हा विमानात सात प्रवासी आणि तीन चालक होते.
हे ही वाचा:
सांगलीमधील आश्रमशाळेतील १७० मुलांना विषबाधा
पारुल चौधरी पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र
…आणि रेल्वे सुरक्षा दलाचे कर्मचारी, तिकीट तपासनीसांना डोळ्यावर बांधल्या पट्ट्या
ऑनलाइन काम करणाऱ्यांना आम्ही लाइनवर आणले!
एकेकाळी प्रिगोझिन यांना पुतिन यांचे निकटवर्तीय मानले जात. त्यांचा जन्म सन १९६१मध्ये लेनिनगार्ड येथे झाला होता. २० वर्षांचे होईपर्यंत त्यांच्यावर मारहाण, दरोडा आणि फसवणुकीचे गुन्हे दाखल होते. त्यानंतर त्यांना १३ वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली होती. मात्र नऊ वर्षांतच त्यांची सुटका करण्यात आली. त्यानंतर कालांतराने ते ‘व्हॅगनर’ या खासगी सशस्त्र गटाचे प्रमुख बनले आणि रशियाला विविध लष्करी कारवायांमध्ये मदत करू लागले. मात्र दोन महिन्यांपूर्वी प्रिगोझिन यांनी रशियन लष्कराविरुद्ध बंड पुकारले होते.
याआधी प्रिगोझिन त्यांच्या ‘व्हॅगनर’ या खासगी सशस्त्र गटासोबत युक्रेनमध्ये रशियन लष्करासोबत लढत होते. मात्र बुधवारी प्रिगोझिन यांचा विमान अपघातात मृत्यू झाला. प्रिगोझिन यांच्या मृत्यूनंतर स्वत: पुतिनही सतर्क झाले आहेत. त्यांनी व्हॅगनर आणि अन्य खासगी लष्कराच्या प्रमुखांना अनिवार्य शपथ घेण्याचे आदेश दिले आहेत. त्यांनी रशियाप्रति निष्ठा व्यक्त करण्याच्या शपथेवर स्वाक्षरी करण्याचे निर्देश दिले आहेत.
तर, पाश्चिमात्य गुप्तचर संस्था आणि प्रसारमाध्यमांनी प्रिमोझिन यांच्या मृत्यूमागे पुतिन यांचा हात असल्याचा दावा केला आहे. अर्थात, रशियन सरकारने हा दावा फेटाळून लावला आहे.