फ्रान्समधील शाळांमध्ये लवकरच इस्लामिक अबाया पोषाखांवर बंदी घालण्यात येणार आहे. अशाप्रकारे शाळांमध्ये पोषाख परिधान करणे, हे धर्मनिरपेक्ष कायद्यांचे उल्लंघन असल्याचे नमूद करून फ्रान्सच्या शिक्षणंत्र्यांनी नवीन शैक्षणिक वर्षापूर्वी शाळाप्रमुखांना या संदर्भातील नियमावली दिली जाईल, असे जाहीर केले आहे. इस्लामधर्मीय परिधान करत असलेल्या लांब, पायघोळ झग्याला ‘अबाया’ म्हटले जाते.
इस्लामिक अबाया पोषाखामुळे फ्रान्सच्या कठोर धर्मनिरपेक्ष कायद्याचे उल्लंघन केले आहे. शाळेत यापुढे अबाया घालता येणार नाही, असे फ्रान्सचे शिक्षणमंत्री गॅब्रिएल अटल यांनी एका वृत्तवाहिनीला सांगितले. फ्रान्समध्ये ४ सप्टेंबरपासून नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होणार आहे. तत्पूर्वी सर्व शाळाप्रमुखांना या संदर्भातील राष्ट्रीय स्तरावरील नियमावली दिली जाईल, असे शिक्षणमंत्र्यांनी सांगितले.
शाळांमध्ये अबाया परिधान करण्यावरून गेल्या अनेक महिन्यांपासून वादविवाद सुरू आहेत. फ्रान्समध्ये आधीच महिलांना इस्लामिक ‘हेडस्कार्फ’ घालण्यास बंदी घालण्यात आली आहे. उजव्या आणि कट्टर उजव्या गटाने या बंदीसाठी दबाव आणला होता. मात्र अशाप्रकारे बंदी घालणे, हे नागरी स्वातंत्र्यावर अतिक्रमण ठरेल, अशी भीती डाव्या गटाने व्यक्त केली होती.
शिक्षक आणि पालक यांच्यातील वादामुळे शाळांमध्ये अबाया अधिकाधिक परिधान केले जात असल्याच्या बातम्या आल्या आहेत आणि शाळांमध्ये तणाव निर्माण झाला आहे. ‘धर्मनिरपेक्षता म्हणजे शाळेद्वारे स्वतःला मुक्त करण्याचे स्वातंत्र्य आहे. मात्र ‘अबाया’ या पेहरावामुळे शाळेमधील धर्मनिरपेक्षतेच्या मूलभूत उद्देशालाच तडा जात आहे, याकडे शिक्षणमंत्र्यांनी लक्ष वेधले आहे. ‘तुम्ही जेव्हा वर्गात प्रवेश करता, तेव्हा त्यांच्याकडे पाहून त्यांचा धर्म कोणता, हे कळता कामा नये.
मार्च २००४च्या कायद्यानुसार, कोणतेही विशिष्ट चिन्ह किंवा पोषाख याद्वारे ज्या व्यक्तीची धार्मिक संलग्नता दिसत असेल, अशा वस्तू शाळेत परिधान करण्यावर बंदी घालण्यात आली आहे. यामध्ये मोठा क्रॉस, ज्यू किप्पा आणि इस्लामिक हेडस्कार्फ यांचा समावेश आहे. मात्र हा कायदा असला तरी, त्याचे पालन काटेकोरपणे केला जात नव्हते. आता मात्र या कायद्याची अंमलबजावणी कठोरपणे केली जाणार आहे.
हे ही वाचा:
चांद्रयान ३ ने मातीचे पहिले परीक्षण नोंदविले
सातारामधील आश्रमशाळेतील १७० मुलांना विषबाधा
पारुल चौधरी पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र
गॅलेक्सी हॉटेलमध्ये लागलेल्या आगीत तीन दगावले
शिक्षण मंत्रालयाने गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये या संदर्भातील परिपत्रक काढले होते. त्यात अबायाचे वर्णन प्रतिबंधित वस्तूंच्या यादीत केले होते. त्यामुळे या पोषाखाच्या परिधानावर बंदी घातली जाऊ शकते, असेही यात नमूद करण्यात आले होते. ‘धार्मिक संलग्नता उघडपणे प्रदर्शित करण्यासाठी अशा प्रकारे कपडे परिधान केले जातात,’ असे या परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे.
मुख्य शिक्षक संघटनांनी या विषयावर संमिश्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. काहींनी या घोषणेचे स्वागत केले आहे तर, काही जणांनी हा नियम घटनाबाह्य असल्याची टीका केली आहे.