पुढील महिन्यात होणाऱ्या जी-२० लीडर्स समिटसाठी भारत पूर्णपणे तयार आहे. जी-२० परिषदेच्या इतिहासातील हा आतापर्यंतचा सर्वांत मोठा सहभाग असेल. त्यामुळेच सप्टेंबर महिना भारताच्या क्षमतेचा साक्षीदार असणारा आहे, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला. ‘मन की बात’चा आज १०४ वा भाग होता. त्यातून पंतप्रधानांनी देशवासियांशी संवाद साधला.
पंतप्रधान मोदी म्हणाले की, भारताने आपल्या अध्यक्षपदाच्या कारकिर्दीत जी-२० ला अधिक समावेशक मंच बनवले आहे. भारताच्या निमंत्रणावरूनच आफ्रिकन संघ जी-२० मध्ये सामील झाला आणि आफ्रिकेतील लोकांचा आवाज जगाच्या या महत्त्वाच्या व्यासपीठावर पोहोचला असल्याचेही ते म्हणाले.
चांद्रयानाच्या यशस्वीतेने उत्सवाचे वातावरण कित्येक पटींनी उत्साहपूर्ण!
श्रावण म्हणजे सदाशिवाचा महिना, उत्सव आणि उल्हासाचा महिना. चांद्रयानाच्या यशस्वीतेने या उत्सवाच्या वातावरणाला कित्येक पटींनी उत्साहपूर्ण बनवलं आहे. चांद्रयान चंद्रमावर पोहोचण्याच्या घटनेस आता तीन दिवसांहून अधिक काळ गेला आहे. हे यश इतकं मोठं आहे की त्याची चर्चा जितकी केली तरी ती कमीच आहे.
श्रद्धास्थानं, आजूबाजूचा परिसर कायम स्वच्छ ठेवा!
आता सणांचा मौसमही आला आहे. तुम्हा सर्वांना रक्षाबंधनाच्या अग्रीम हार्दिक शुभेच्छा. उत्सव साजरा करताना व्होकल फॉर लोकल हा मंत्र लक्षात ठेवायला हवा. ‘आत्मनिर्भर भारत’ अभियान ही प्रत्येक देशवासियाची स्वतःची मोहीम आहे आणि जेव्हा सणासुदीचा काळ असतो तेव्हा तर आपण आपली श्रद्धास्थानं आणि आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवलाच पाहिजे. पण कायमही स्वच्छ ठेवला पाहिजे.
जागतिक संस्कृत दिनाच्या शुभेच्छा
पंतप्रधान मोदी यांनी विश्व संस्कृत दिनाच्या संस्कृतमधून शुभेच्छा दिल्या आहेत. यात त्यांनी भारतीय संस्कृतीतील संस्कृतचे महत्त्व अधोरेखित केले. संस्कृत ही प्राचीन भाषा असून योग, शास्त्रांसारख्या गोष्टी संस्कृत भाषांमध्ये आहे, असं पंतप्रधान मोदी म्हणाले.
हे ही वाचा:
भारतात हातपाय पसरण्याचा दहशतवादी संघटना आयसीसचा प्रयत्न
सीबीआय चौकशी सुरू असलेल्या सीमाशुल्क अधिकाऱ्याची आत्महत्या
लँडिंग पॉईंटच्या ‘शिवशक्ती’ नावावरून काँग्रेसला पोटशूळ
प्रज्ञानंद, बजरंग होणार आशियाई क्रीडा स्पर्धेत सहभागी
भारताची विविधता, चैतन्यशील लोकशाही पाहून प्रभावित!
गेल्या वर्षी बालीमध्ये भारताला जी २० चं अध्यक्षपद मिळाल्यानंतर आतापर्यंत इतकं काही घडलं आहे की, ते आपल्याला स्वाभिमानानं भरून टाकतं. मोठमोठे कार्यक्रम दिल्लीत आयोजित करण्याच्या परंपरेपासून वेगळं होऊन आपण ही परिषद देशातील ६० वेगवेगळ्या शहरांत नेली. देशातील ६० शहरांमध्ये या परिषदेशी संलग्न अशा २०० बैठकांचं आयोजन केलं. जी २० प्रतिनिधी जिथं जिथं गेले, तेथे लोकांनी त्यांचे अतिशय उत्साहानं स्वागत केलं. हे प्रतिनिधी भारताची विविधता, आपली चैतन्यशील लोकशाही, पाहून खूपच प्रभावित झाले. भारतात असणाऱ्या विविध शक्यतांचा त्यांना अनुभव आला.
मेघालयातील लेण्यांना भेट द्या!
भारतातील काही सर्वांत लांब आणि खोल गुहा मेघालयात आहेत. ब्रायन जी आणि त्यांच्या टीमने cave fauna म्हणजेच गुहांमधील अशा जीवसृष्टीचे दस्तऐवजीकरण केले आहे, जे इतरत्र जगात कोठेही आढळत नाहीत. या संपूर्ण टीमच्या प्रयत्नांचे मी कौतुक करतो. त्या सोबतच मी आपणा सर्वांना मेघालयच्या लेण्यांना भेट देण्याची विनंती करतो.
डेअरी क्षेत्र देशातील सर्वांत महत्त्वाच्या क्षेत्रांपैकी एक
डेअरी क्षेत्र, आपल्या देशातील सर्वांत महत्त्वाच्या क्षेत्रांपैकी एक आहे. आपल्या माता आणि बहिणींच्या आयुष्यात मोठा बदल घडवून आणण्यात तर ह्या क्षेत्राची महत्वाची भूमिका आहे. काही दिवसांपूर्वी मला गुजरातच्या बनास डेअरीच्या एका विशेष उपक्रमाविषयी माहिती मिळाली. बनास डेअरी, आशियातील सर्वांत मोठी डेअरी मानली जाते. येथे सरासरी दररोज ७५ लाख लिटर दुधावर प्रक्रिया केली जाते. या नंतर ते इतर राज्यांत देखील पाठवले जाते. इतर राज्यांमध्ये दूध वेळेवर पोचावे म्हणून, आतापर्यंत टँकर किंवा दुधाच्या गाड्यांची – मिल्क ट्रेन्स ची मदत घेतली जायची.पण ह्यांत देखील आव्हाने काही कमी नव्हती. एक म्हणजे लोडिंग आणि अनलोडिंगला खूप वेळ लागायचा.त्यात अनेक वेळा दूध खराबही व्हायचे. ह्या समस्येवर मात करण्यासाठी भारतीय रेल्वेने एक नवा प्रयोग केला.
रेल्वेने पालनपूर ते नवीन रेवाडीपर्यंत ट्रक-ऑन-ट्रॅक ही सुविधा सुरू केली. यामध्ये दुधाचे ट्रक थेट रेल्वेवर चढवले जातात. म्हणजेच त्यामुळे वाहतुकीची मोठी समस्या दूर झाली आहे. ट्रक ऑन ट्रॅक सुविधेचे परिणाम अतिशय समाधानकारक आहेत. पूर्वी दूध पोहोचायला जे ३० तास लागायचे ते आता निम्म्याहून कमी वेळात पोहोचत आहे. यामुळे एकीकडे इंधनामुळे होणारे प्रदूषण थांबले आहेच, तर दुसरीकडे इंधन खर्चातही बचत होत आहे. याचा मोठा फायदा ट्रक चालकांना होत आहे. त्यांचे जीवन सोपे झाले आहे.