ज्येष्ठ नेते शरद पवार आणि त्यांच्या कन्या सुप्रिया सुळे यांची दोन दिवसातील विधाने ऐकली तर जी मनस्थिती निर्माण होते, त्याला मराठीत बुचकळ्यात पडणे म्हणतात. प्रहारचे सर्वेसर्वा बच्चू कडू यांनी या घडामोडींवर मार्मिक टिप्पणी करताना म्हटले आहे, की जास्त लक्ष दिले तर डोकं फुटायची वेळ येईल. हा ऑलिम्पिकपेक्षा मोठा गेम आहे. पवार नीती इतकी जटील आहे, की ती समजून घेण्यात राजकीय नेत्यांचा गोंधळ होतो आहे.
एकाच वेळी अनेक आयुधे धारण करणाऱ्या योद्ध्याप्रमाणे शरद पवार एकाच वेळी अनेक प्रकारची विधाने करतायत. जी परस्पर विरोधी आहे. ‘लोकसभा निवडणुकी आधी शरद पवार भाजपासोबत जातील, अशी चर्चा आहे’, असा प्रश्न विचारणाऱ्या पत्रकाराला शरद पवार झापतात. ‘काहीही प्रश्न काय विचारता, जर अक्कल वापरा’ अशी शेलकी भाषा वापरतात. पण तेच पवार म्हणतात, ‘अजित पवारांनी वेगळी भूमिका घेतली तरी ते आमचेच आहेत.’
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडलेली नाही, असे आधी सुप्रिया सुळे म्हणाल्या. तेच थोरले पवारही म्हणाले. अजित पवार आमचेच आहेत, वेगळा निर्णय घेतला म्हणून फूट पडली असे म्हणण्याचे काही कारण नाही. अशी भूमिका उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्याबाबत घेतली असती तर महाराष्ट्रात राडा झालाच नसता. पवारांच्या भूमिकेमुळे गोंधळ निर्माण होतो आहे. हा गोंधळ फक्त सर्वसामान्य लोकांमध्ये नाही तर राजकीय नेत्यांमध्येही आहे. ‘काका-पुतणे लोकांना वेड्यात काढतायत. शिवसेना फुटल्यानंतर जे घडले होते ते इथे घडताना दिसत नाही. राष्ट्रवादी काँग्रेसने दोन-तीन रस्ते पाहून ठेवले आहेत. ते सगळ्यांचा संगम बनवून स्वत:चाच सागर बनवतील,’ ही प्रहार संघटनेचे बच्चू कडू यांची प्रतिक्रीया. अगदी नेमक्या शब्दात त्यांनी सांगितले आहे.
पवार थोरले एनडीएच्या वाटेवर आहेत, अशी शक्यता भाजपा नेते अतुल भातखळकर यांनी व्यक्त केली आहे. देशाच्या विकासासाठी आणि प्रगतीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाची गरज आहे, असे जाहीर करून अजित पवारांनी एनडीएमध्ये प्रवेश केला, त्याच मार्गावर सुप्रिया सुळे आणि शरद पवार आहेत. पवारांच्या या भूमिकेमुळे शिउबाठाला फेफरे येण्याची वेळ आहे. अजित पवार आणि शरद पवार यांची कोरेगावात गाठभेट झाल्यानंतर पवारांचे चेले आणि शिउबाठाचे नेते संजय राऊत यांनी दिलेली प्रतिक्रीया तिखट होती. तुम्ही नाती सांभाळायची आणि कार्यकर्त्यांनी एकमेकांची डोकी फोडायची हे कसे चालेल? असा त्यांचा सवाल होता.
अशा प्रकारच्या प्रतिक्रिया आल्यानंतर थोरले पवार लगेचच सारवासारव करतात. ‘भाजपाची विचारसरणी आमच्या चौकटीत बसत नाही, त्यामुळे भाजपासोबत जाण्याचा प्रश्नच येत नाही’, असा एखादा डायलॉग मारतात. मविआच्या नेत्यांनाही हायसे वाटते. शरद पवार कुठेही जाणार नाही, असे मविआचे नेते मंडळी जाहीर करतात. वातावरण थंड झाले की थोरले पवार काही दिवसांनी पुन्हा बार उडवून देतात. विधान परीषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी आज दबक्या आवाजात प्रतिक्रीया दिलेली आहे, ‘अशा प्रकारच्या विधानामुळे लोकांमध्ये संभ्रम निर्माण होतो.’
हे ही वाचा:
चांद्रयान -३ लँडर रोव्हरची चांद्रमोहीम १४ दिवसांनंतर संपणार
नीरज चोप्राचा ‘पॅरिसस्पर्श’; जागतिक स्पर्धेतून ऑलिम्पिकसाठी पात्र
आयआयटी मुंबईला अज्ञात व्यक्तीकडून १६० कोटींची देणगी
इस्रोचे पुढील लक्ष्य ‘आदित्य -एल १’
पवारांची ही अजब रणनीती सुरू आहे. विरोधात पण तेच आणि सत्तेतही तेच. अशी रणनीती तर नेपोलियन बोनापार्टच्याही आवाक्या पलिकडची आहे. मविआमध्ये सतत काड्या करत राहायचे. अस्वस्थता, संभ्रम आणि गोंधळाचे वातावरण निर्माण करायचे. संशयाचे धुके गडद करायची आणि धुरळाही उडवायचा. ही सध्या पवारांची रणनीती आहे. सुप्रिया सुळे म्हणाल्या, ‘अजित पवार आमचे नेते’. पवार आधी तेच म्हणाले, मग घुमजाव करत म्हणाले, ‘सुप्रिया म्हणू शकते मी म्हटलेले नाही’. सुप्रिया सुळे म्हणाल्या, ‘भाजपाने राष्ट्रवादी फोडण्यासाठी तीन वेळा प्रयत्न केले. अखेर त्यांना यश आले’. शरद पवार म्हणतात, ‘अजित पवार यांची भूमिका पक्षविरोधी, परंतु पक्षात फूट पडलेली नाही’.
पहाटेच्या शपथविधीचा मुद्दा पुन्हा पवारांनी काढला, ‘अजित पवारांना एकदा संधी दिली, पुन्हा देणार नाही’, असे ते म्हणाले. म्हणूनच बच्चू कडू म्हणायत की, ‘हा मोठा गेम आहे, लक्ष दिले तर डोकं फुटायची वेळ येईल’. सुप्रिया सुळे आणि शरद पवार एका बाजूला आहेत. विरोधकांच्या I.N.D.I.A. या आघाडीत आहेत. अजित पवार रालोआमध्ये आहेत, परंतु ते सुप्रिया यांचे नेते आहेत. सुप्रिया यांच्या मते पक्ष फुटलाय, परंतु शरद पवार यांच्या मते अजित पवारांनी फक्त पक्षविरोधी भूमिका घेतली आहे. परंतु ते आमचेच आहेत, यात वाद असण्याचे काही कारणच नाही. या वादामुळे बच्चू कडू यांचे डोकं फुटणार नाही. परंतु मविआतील नेत्यांचे मात्र डोके हा विचार करून नक्की फुटणार की शरद पवार नेमके कुठे आहेत? अजित पवार यांनी पक्षविरोधी भूमिका घेतलेली आहे, थोरल्या पवारांनी हे मान्य केले हेही नसे थोडके. परंतु पक्षविरोधी भूमिका घेणाऱ्या अजित पवारांच्या विरोधात कोणतीही कारवाई होणार नाही. संजय राऊत यांनी नेमकं याच मुद्द्यावर बोट ठेवलेले आहे. ‘राष्ट्रवादीत फूट पडली नाही मग शरद पवारांनी ज्या सुनील तटकरे यांची हकालपट्टी केली ते अजित पवार यांच्या पक्षाचे अध्यक्ष कसे?
या गटाने शरद पवारांची अध्यक्ष पदावरून हकालपट्टी केलेली आहे’. संजय राऊतांनी शरद पवारांचे खोटे राजकारण उघडे पाडले आहे. परंतु पवार बनवाबनवी करतायत असे ते बोलू शकत नाही. कारण एक तर तुम्ही पवारांसाठी खुर्ची उचलू शकता किंवा जाब विचारू शकता. दोन्ही गोष्टी करू शकत नाही. तळ्यात मळ्यातली जी भूमिका पक्ष पातळीवर शरद पवार घेतायत, तिच भूमिका मविआ म्हणून संजय राऊत घेत आहेत. दोघांची मजबुरी आहे. पक्षविरोधी कारवाया करूनही शरद पवार अजित पवारांच्या विरोधात भूमिका घेत नाहीत, त्यांच्या गाठीभेटी घेतात, त्यांच्याशी चर्चा करतात, ते आमचेच आहेत, असे सांगतात. तर ‘पवार हे मविआचे महत्वाचे नेते आहेत, ते आमच्या सोबतच आहेत, ते भाजपासोबत जाणार नाही’, असे राऊतांना म्हणावे लागत आहे. कारण शरद पवार नसले तर मविआला काय किंमत उरणार? मविआच्या नेत्यांची सहनशक्ती तुटेपर्यंत पवार ताणत राहणार. अजित पवार यांनी पवारांच्या भूमिकेवर मौन बाळगणे हेही बोलके नाही का?
(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)