बहुचर्चित अशी भारताची चांद्रयान- ३ ही महत्त्वाकांक्षी मोहीम यशस्वी ठरली असून चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पोहचणारा भारत हा जगातील पहिला देश ठरला आहे. या ऐतिहासिक क्षण थेट प्रक्षेपणाच्या माध्यमातून भारतीयांनी अनुभवला. तर, लँडिंग प्रक्रिया पूर्ण होताच देशभरात उत्साहाचे वातावरण होते, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सध्या दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर असून ते तिथून ऑनलाईन उपस्थित राहून ही प्रक्रिया अनुभवत होते.
भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे म्हणजेच इस्रोचे प्रमुख शास्त्रज्ञ सोमनाथन यांनी बुधवार, २३ ऑगस्ट रोजी चांद्रयान- ३ मोहिम यशस्वी झाल्याची घोषणा केली. यावेळी ते म्हणाले की, “प्रिय पंतप्रधान महोदय, आपण चंद्रावर सॉफ्ट लँडिंग करण्यात यश मिळवले आहे. भारत चंद्रावर आहे.” यानंतर त्यांनी या मोहिमेत आपले अमुल्य योगदान देणाऱ्या शास्त्रज्ञांचे आभार मानले.
#WATCH | "India is on the Moon": ISRO chief S Somanath as Chandrayaan 3 lander module Vikram makes safe and soft landing on the Moon pic.twitter.com/5xEKg0Lrlu
— ANI (@ANI) August 23, 2023
त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय शास्त्रज्ञांना शुभेच्छा देत अखंड भारतासाठी हा महत्त्वाचा क्षण असल्याचे सांगितले. आपल्या डोळ्यांच्या समोर इतिहास घडताना पाहतो तेव्हा जीवन धन्य होते. हा क्षण अविस्मरणीय आहे. हा क्षण १४० कोटी लोकांच्या आशेचा आहे. नव्या चेतना आणि उर्जेचा आहे. नव्या भारताचा आहे, असं नरेंद्र मोदी यावेळी म्हणाले.
हे ही वाचा:
जय हो! भारत चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर अवतरणारा पहिला देश ठरला!
इटलीत नोकरी देतो सांगितले; पण लिबियात सशस्त्र गटाच्या तावडीत सापडले
गुजरातच्या तुरुंगात कैद्यांना आणि हिऱ्यांना पाडले जातात पैलू!
प्रज्ञानंद- कार्लसन पहिला डाव बरोबरीत
चांद्रयान- ३ हे अनेक टप्पे पार करून ४० दिवसांनी चंद्रावर पोहचले. चांद्रयान- ३ ने १४ जुलै २०२३ या दिवशी आंध्र प्रदेशातील श्री हरिकोटा येथून यशस्वी उड्डाण केले होते. दरम्यान बुधवारी चांद्रयान- ३ ला ४ वाजून ५० मिनिटांनी अंतिम कमांड देण्यात आली. पुढे ५ वाजून ४५ मिनिटांनी लँडिंग प्रक्रियेला सुरुवात झाली. त्यानंतर ठीक ६ वाजून ४ मिनिटांनी यानाने चंद्राच्या पार्श्वभूमीला स्पर्श करत इतिहास रचला.