परदेशात नोकरीचे आमिष दाखवून १७ भारतीयांची लाखोंची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. इटलीमध्ये चांगल्या नोकरीचे आमिष दाखवून त्यांना लिबियाला पाठवण्यात आले होते. इतकेच नव्हे तर लिबियामध्ये या भारतीयांना सशस्त्र गटांनी कैद केले होते. या भारतीयांना पुरेसे अन्न-पाणी न देताच त्यांच्याकडून जबरदस्तीने काम करवून घेतले जात होते. अर्थात परराष्ट्र मंत्रालयाच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे सर्वांना सुरक्षितपणे भारतात आणण्यात आले आहे. हे भारतीय नागरिक पंजाब, हरियाणातील असून ते रविवारी रात्रीच दिल्लीत पोहोचले आहेत.
या भारतीयांना लिबियातील ज्वारा शहरातील सशस्त्र गटाने कैद केले होते. त्यासाठीच त्यांना बेकायदा पद्धतीने देशात आणले गेले होते. ट्युनिशियातील भारतीय दूतावासाने मे आणि जूनमध्ये या प्रश्नासंबंधी लिबिया प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा केला होता. १३ जून रोजी लिबिया प्रशासनाला भारतीय नागरिकांची सुटका करण्यात यश आले. मात्र बेकायदा पद्धतीने या देशात प्रवेश केल्याप्रकरणी त्यांना ताब्यात ठेवण्यात आले होते.
हे ही वाचा:
झिम्बाब्वेचे माजी क्रिकेटपटू हीथ स्ट्रीक यांच्या निधनाच्या बातम्या खोट्या
सनी देओलच्या ‘गदर’ची ४०० कोटींच्या क्लबमध्ये धडक
शिवडीच्या चाळीत सापडले २ कोटींचे मेफेड्रोन
अँटिलिया स्फोटके, मनसुख हत्याकांड प्रकरणी प्रदीप शर्माला जामीन मंजूर
ट्युनिशियातील भारतीय दूतावास आणि नवी दिल्लीतील परराष्ट्र मंत्रालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी वारंवार याबाबत पाठपुरावा केला. त्यानंतर लिबिया प्रशासनाने त्यांची सुटका करण्यास मंजुरी दिली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, लिबियामध्ये या भारतीय नागरिकांच्या सर्व आवश्यक गरजांची पूर्तता भारतीय दूतावासामार्फत करण्यात आली. या नागरिकांकडे पासपोर्ट नसल्याने त्यांना भारतात पाठवण्यासाठी तत्काळ प्रमाणपत्रे दिली गेली. तसेच, भारतात परतण्यासाठी तिकिटांचे पैसेही भारतीय दूतावासानेच दिले.
हे सर्व भारतीय नागरिक फेब्रुवारी २०२३पासूनच लिबियात होते. ते २० ऑगस्ट, २०२३मध्ये गल्फ एअरच्या विमानाने भारतात सुरक्षितरीत्या पोहोचले होते. ट्युनिशियातील भारतीय दूतावासाने या भारतीय नागरिकांची सुटका करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनीही ‘एक्स’वर भारतीय दूतावासाच्या या कामगिरीचे कौतुक केले.