ग्रीसमध्ये सध्या पर्यटकांचा हंगाम सुरू आहे. त्यातही पारोस बेटावर मोनास्ट्री समुद्रकिनाऱ्यावर पर्यटकांची गर्दी झाली आहे. किनाऱ्यावर वाळूत ठेवल्या जाणाऱ्या ऐशारामी ‘लाँज चेअर’ची मागणीही वाढली आहे. मात्र या ‘लाँज चेअर’च्या अतिक्रमणामुळे स्थानिकांना या समुद्रकिनाऱ्यावर फिरणे, टॉवेल अंथरून बसणेही दुरापास्त झाले आहे. म्हणूनच स्थानिकांनी याचा निषेध करत ‘बीच टॉवेल मूव्हमेंट’ सुरू केली आहे.
ग्रीसमधील पर्यटकांची संख्या वाढल्यामुळे बार, हॉटेलांकडून ठेवल्या जाणाऱ्या समुद्रकिनाऱ्यावरील दोन खुर्च्यांची जोडी तब्बल ७० युरो किमतीला मिळते आहे. काही दिवसांपूर्वीच या खुर्च्या अर्ध्याहून अधिक किमतीत मिळत होत्या. मात्र आता पर्यटकांचा हंगाम सुरू झाल्याने या खुर्च्यांचे दरही गगनाला भिडले आहेत. मात्र ज्यांची इतके पैसे खर्च करण्याची तयारी नाही, त्यांनी झाडांच्या सावलीत आश्रय घेतला आहे.
‘काही वेळा तर संपूर्ण किनारा पर्यटकांनी भरून गेलेला असतो. कधी कधी तर वाटते, ही गर्दी आम्हाला या बेटावरूनच ढकलून देईल. किनाऱ्यावर असणाऱ्या बीच बारच्या खुर्च्या त्यांना वापरायला न मिळाल्यास काही पर्यटकांना ते आवडत नाही,’ असे एका स्थानिकाने सांगितले. स्टेफनो सारख्या बर्याच स्थानिक लोकांचे म्हणणे आहे की समुद्रकिनारी असलेल्या व्यवसायांमुळे त्यांच्याकडे टॉवेल अंथरण्यासाठी वाळूचा एक तुकडाही शिल्लक राहिलेला नाही.
अलिकडेच ‘पॅरोस किनारा वाचवा’ ही चळवळही स्थानिकांनी सुरू केली आहे. या चळवळीत सर्व वयोगटातील शेकडो लोक सहभागी झाले होते. ‘आम्हाला आमचा समुद्रकिनारा परत करा’ अशा बॅनरसह येथील तीन समुद्रकिनाऱ्यावर लोकांनी आंदोलने केली होती. जुलैमध्ये सुरू झालेली ही ‘बीच टॉवेल मुव्हमेंट’ देशव्यापी झाली आहे. ग्रीसमध्ये सर्व समुद्रकिनारे सार्वजनिक आहेत. स्थानिक प्रशासनाने हे किनारे बार, रेस्टॉरंट आणि हॉटेलांना लीजवर दिले आहेत. नियमानुसार, समुद्रकिनाऱ्यावरील ५० टक्क्यांहून अधिक भाग या व्यावसायिकांनी व्यापता कामा नये. मात्र हे व्यावसायिक नियमांचे उल्लंघन करून अधिक जागेवर अतिक्रमण करत आहेत. पारोसची लोकसंख्या १४ हजार आहे. मात्र या हंगामात येथील लोकसंख्येत दहापट वाढ झाली आहे. ज्यांचे व्यवसाय चांगले चालत आहेत, ते ‘व्हीआयपी सन लॉंजर्स’साठी तब्बल १२० युरोचा दर आकारत आहेत, असा दावा रहिवाशांनी केला.
अर्थात हे झाले स्थानिकांचे. मात्र येथे येणारे पर्यटकही खूष नाहीत. जर्मनीमधून आलेले वासिलिओस पारास्केवास यांना आणि त्यांच्या पत्नीला स्वत:ची वाळूतली छत्री लावण्यासाठीही जागा मिळाली नाही. ‘आम्ही ना डावीकडे जाऊ शकलो, ना उजवीकडे. आम्हाला जागाच मिळाली नाही. त्यामुळे आम्हाला अखेर एका झाडाखाली आश्रय घ्यावा लागला,’ असे त्यांनी सांगितले.
हे ही वाचा:
वैमानिकाला विमानात हृदयविकाराचा झटका, सहवैमानिकांनी विमान उतरविले
डीआरडीओचे माजी महासंचालक डॉ. व्ही. एस. अरुणाचलम यांचे निधन
मविआचा पोपट मेलाय ! पण घोषणा कोण करणार ?
स्वातंत्र्यदिनानिमित्त पोस्ट केलेल्या पाक क्रिकेट संघाच्या व्हिडीओत इम्रानच होता गायब…
टॉवेल चळवळीने जोर धरल्यानंतर प्रशासनाने त्वरित पावलेही उचलली. जूनअखेरीस काही पोलिसांनी पारोसमधील दोन समुद्रकिनाऱ्यावरील खुर्च्या काढून टाकल्या. मात्र ही कारवाई तात्पुरतीच ठरली. ‘ग्रीकवासींना मूलभूत अधिकारापासून दूर ठेवणाऱ्या, व्यावसायिकांकडून होणाऱ्या अतिक्रमणांचा या चळवळीच्या माध्यमातून निषेध करण्यात आला. बेलगाम नफेखोरी वाढल्यामुळे ग्रीक लोक सार्वजनिक जागेवर आपला पुन्हा हक्क सांगण्यासाठी हा लढा देत आहेत,’ अशा शब्दांत अथेन्समधील राज्यशास्त्राचे प्राध्यापक सेराफिम सेफेरीएड्स यांनी या आंदोलनाचे वर्णन केले.