राहुल गांधी यांनी लोकसभेत अविश्वास प्रस्तावाला उत्तर दिल्यानंतर नरेंद्र मोदी यांचेही जवळपास २ तास १३ मिनिटांचे घणाघाती भाषण झाले. पण या भाषणामुळे विरोधकांचा प्रचंड जळफळाट झाला असला पाहिजे. कारण अधिवेशन संपल्यावर काँग्रेसकडून राहुल गांधी यांना कसे संसद टीव्हीच्या माध्यमातून फार कमी वेळ टीव्हीवर दाखविण्यात आल्याचा दावा केला गेला. अधिक वेळ लोकसभा अध्यक्षांना दाखविण्यात आले तर राहुल गांधी यांना फक्त चार मिनिटे दाखविले गेले असे रडगाणे काँग्रेसने गायला सुरुवात केली. पण त्याचवेळी राहुल गांधी यांना संसद टीव्हीचे यूट्युब, काँग्रेसचे यूट्युब, इतर सोशल मीडिय़ाचे मंच याठिकाणी कसा जबरदस्त प्रतिसाद मिळाला याचेही कौतुक केले गेले. यूट्युबला राहुल गांधी यांनी मोदी यांच्यापेक्षा सरस कामगिरी केली असाही दावा केला गेला. हो दोन्ही दावे परस्परविरोधी होते. पण एकूणच राहुल गांधी हेच कसे नरेंद्र मोदी यांच्यापेक्षा वरचढ आहेत, याचा पाढा वाचला गेला.
मुळात राहुल गांधी यांना मिळालेले व्ह्यूज आणि नरेंद्र मोदी यांना मिळालेले व्ह्यूज यावरून कोण वरचढ किंवा कोण कमकुवत हे ठरत नाही. तसे पाहिले तर नरेंद्र मोदी यांच्या एक्स हँडलवर २३ लाख लोकांनी व्हीडिओ पाहिल्याचे दिसते तर राहुल गांधींच्या एक्स हँडलवर १३ लाख लोकांनी त्यांचे भाषण पाहिल्याचे दिसते. मग यातून मोदी वरचढ आहेत असे म्हणता येईल का? खरे तर या व्ह्यूजवरून कुणी निवडणुकीत बाजी मारेल किंवा राजकारणा सर्वश्रेष्ठ ठरेल असे म्हणता येत नाही. पण काँग्रेसने तो प्रयत्नही आता सुरू केला आहे. त्यातून आपल्या नेत्याला आगामी निवडणुकात वरचढ दाखविण्याचा केविलवाणा प्रयत्न ते करत आहेत.
राहुल गांधी यांना संसद टीव्हीने फार वेळ दाखविले नाही, असा दावा करताना काँग्रेसला याचा विसर पडला की, राहुल गांधी हे तरी कुठे संपूर्ण वेळ संसदेत बसलेले होते. मुळातच त्यांना खासदारकी बहाल झाली त्यानंतर ते दुसऱ्या दिवशी म्हणजे मंगळवारी संसदेत येणार, १२ वाजता त्यांचे भाषण होणार अशी चर्चा रंगली होती. त्यामुळे १२ वाजता सगळे प्रतीक्षा करत होते पण राहुल गांधी तिथे आले नाहीत. त्यावर मग राहुल गांधींची प्रतीक्षा कशी सगळेजण करत होते, भाजपालाही वाट पाहावी लागली असे स्वतःचेच गुणगान केले गेले. शेवटी बुधवारी राहुल गांधी आले आणि त्यांनी ३७ मिनिटे भाषण केले. हे भाषण केल्यानंतर ते तडक राजस्थानला गेले. त्यानंतर ते आपल्या सदस्यांची किंवा सत्ताधारी पक्षातील सदस्यांची भाषणे ऐकायला थांबले नाहीत. अमित शहा यांचेही दीर्घ भाषण झाले, तेही त्यांनी ऐकले नाही. मग राहुल गांधी हे कुठे यासंदर्भात गंभीर आहेत, असा प्रश्न निर्माण होतो.
हे ही वाचा:
पीएफआय षडयंत्र प्रकरणी एनआयएकडून ५ राज्यांत १४ ठिकाणी छापे!
भूमाफिया लेडी डॉन करीना शेखसह तिघांवर गुन्हा
पाकिस्तानात चिनी अभियंत्यांच्या गटावर दहशतवादी हल्ला
श्रीनगरमध्ये शालेय विद्यार्थी तिरंगामय !
नरेंद्र मोदी संसदेत येत नाहीत म्हणून आरडाओरडा करणारे विरोधक राहुल गांधी तरी पूर्णवेळ कुठे सभागृहात असतात हा मुद्दा विसरतात. पंतप्रधान तरी आपल्या कामातून संसदेला किती वेळ देता येईल तो देतात. ते विरोधी पक्षनेते अधीररंजन चौधरी यांच्या भाषणासाठी उपस्थित होते. राहुल गांधी तेव्हा नव्हते. शिवाय, नरेंद्र मोदी यांचे भाषण सुरू झाले तेव्हाही राहुल गांधी तिथे नव्हते. ते नंतर सभागृहात आले. त्यानंतर पुन्हा सगळ्या विरोधकांनी मोदींच्या भाषणावर बहिष्कार घालत पळ काढला. तेव्हाही राहुल गांधी थांबले नाहीत. स्वतः राहुल गांधी हे फक्त खासदारच आहेत. ते कुठल्या महत्त्वाच्या पदावर नाहीत तरीही ते सभागृहात केवळ आपल्या भाषणापुरते आले आणि लगेच निघून गेले. मग कोणत्या अधिकारात आपल्याला फार कमी वेळ दाखविले जाते असा दावा ते करतात?
मुळात राहुल गांधी यांच्याकडे त्यांच्या प्रसिद्धीसाठी सगळे पर्याय आहेत. त्यांनी जेव्हा पदयात्रा काढली तेव्हा संसद टीव्हीने त्यांना दाखविले नाही. त्यांच्या तत्कालिन ट्विटर हँडलवरून त्यांची प्रसिद्धी केली गेली. याच संसद टीव्हीवर आपले भाषण सर्वाधिक लोकांनी बघितले असा दावाही काँग्रेस करते आणि मोदींपेक्षा आपल्या नेत्याला कसे सर्वाधिक लोकांनी बघितले अशी फुशारकीही मारली जाते. त्यावेळी मग संसद टीव्ही अन्याय करतो असे ते म्हणत नाहीत. यातून काँग्रेसची दुटप्पी भूमिका दिसून येते.
आज खरेतर सोशल मीडिया हे प्रसिद्धीचे एक अंग म्हणून ठीक आहे. पण त्यावरच एखाद्या नेत्याचे भवितव्य टिकून नाही. तुम्हाला सोशल मीडियावर व्ह्यूज जास्त मिळाले म्हणून तुम्ही निवडून येणार नाहीत तर त्यासाठी प्रत्यक्ष मैदानात उतरावे लागेल. ते जो करेल त्यालाच राजकारणात भवितव्य आहे. केवळ टाइमपास म्हणून राजकारण केले, पूर्णवेळ राजकारणासाठी दिला गेला नाही तर लोक त्या व्यक्तीलाही पूर्ण वेळ देत नाहीत, हा इतिहास आहे. राहुल गांधी एरवीही राजकारणासाठी किती वेळ उपलब्ध असतात हा प्रश्न आहेच. ते लोकांना वेळ देत नाहीत पण आता त्यांना मात्र सगळ्या टीव्ही माध्यमांनी अधिक वेळ दाखविले पाहिजे, असे म्हटले जात असेल तर तो दावा हास्यास्पद ठरतो.