भारतात सध्या निवडणुकांचा माहोल सुरु असून देशातील पाच विधानसभा निवडणुकांसाठी पक्षांनी कंबर कसली आहे. शनिवार २७ मार्च रोजी पश्चिम बंगाल आणि आसाम विधानसभा निवडणुकांचा पाहिला टप्पा पार पडला. या पहिल्या टप्प्यात पश्चिम बंगालच्या एकूण २९४ जागांच्या विधानसभेपैकी ३० जागांसाठी मतदान झाले. तर आसामच्या १२६ विधानसभा मतदारसंघांपैकी ४७ जागांसाठी मतदारांनी आपला कौल दिला.
या दोन्ही ठिकाणी मतदानाला भरभरून प्रतिसाद मिळाल्याचे दिसले आहे. पश्चिम बंगालमध्ये ७९.७९% इतके मतदान पाहायला मिळाले, तर आसाममध्ये ७२.१४ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. या वेळच्या पश्चिम बंगालच्या निवडणूका पहिल्यापासूनच भारतभर चर्चेत आहेत. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा गड भेदून तिथे आपली सत्ता प्रस्थपित करण्याचा भारतीय जनता पार्टीने चंग बांधला आहे. भाजपाच्या आक्रमक प्रचारापुढे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या बावचळलेल्या दिसत आहे.
हे ही वाचा:
महाराष्ट्रात जमावबंदीची नियमावली जारी
पराभवाच्या भीतीने ममता बॅनर्जी त्रस्त, भाजपा कार्यकर्त्याला फोन करून मदतीची विनवणी
कोविड-१९ विरुद्धच्या आणखी एका लसीच्या चाचणीला सुरूवात
भाजपा बंगालच्या ट्विटर हॅण्डलवरून ट्विट करत ममता बॅनर्जी यांच्यावर आरोप करत त्यांच्यातील आणि भाजपाच्या एका कार्यकर्त्यातील एक संभाषण प्रसिद्ध करण्यात आले. तर ममता बॅनर्जी यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बांगलादेश दौऱ्यावरच निशाणा साधला. मोदी हे बंगालमधील मतदारांना प्रभावित करण्याचा प्रयत्न करत असल्याचे ममतांनी म्हटले आहे. दरम्यान तृणमूल काँग्रेस पक्षाच्या काही नेत्यांनी ईव्हीएम वर आरोप केले आहेत. दरम्यान अनेक मतदान केंद्रांवर तृणमूल काँग्रेस आणि भाजपाचे कार्यकर्ते यांच्यात संघर्ष झाल्याचेही समजत आहे. त्या मानाने आसामच्या निवडणूका शांततेत पार पडताना दिसत आहेत. आसामचे विद्यमान मुख्यमंत्री सरबानंद सोनोवाल यांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला आहे.
आता आसाम निवडणुकीच्या मतदानाचे २ टप्पे शिल्लक असून पश्चिम बंगालच्या निवडणुकांचे ७ टप्पे बाकी आहेत. या निवडणुकांचे निकाल २ मे रोजी लागणार आहेत.