देशातील सर्वांत मोठे ‘कोचिंग हब’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोटामध्ये आत्महत्यांचे सत्र सुरूच आहे. कोचिंग क्लासमधल्या आणखी एका विद्यार्थ्याने आत्महत्या केली असून गेल्या सहा दिवसांतील ही तिसरी घटना आहे. १७ वर्षांचा हा मुलगा उत्तर प्रदेशमधील आझमगढचा होता. हा युवक गेल्या सहा महिन्यांपासून खासगी कोचिंग क्लासमध्ये जेईई परीक्षेची तयारी करत होता. पोलिसांनी त्याचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला असून या प्रकरणी तपास सुरू केला आहे. या वर्षी कोटामध्ये आतापर्यंत सुमारे २१ जणांनी आत्महत्या केली आहे.
गेल्या वर्षी उत्तर प्रदेशातील रामपूर येथे राहणाऱ्या मुलाने आत्महत्या केली होती. तो डॉक्टर होण्यासाठी कोटामध्ये वैद्यकीय परीक्षेची तयारी करत होता. १८ वर्षांचा हा तरुण एप्रिल महिन्यापासून कोटामध्ये शिकत होता. पोलिसांना जेव्हा त्याच्या आत्महत्येबाबत कळले तेव्हा ते तत्काळ हॉस्टेलला पोहोचले होते. तेव्हा त्याची खोली आतून बंद होती. त्याच्या संपूर्ण तोंडावर पॉलिथिनची पिशवी बांधली होती आणि हात मागून बांधले होते.
तर, त्याआधी बिहारच्या १६ वर्षीय विद्यार्थ्याने ५ ऑगस्टला फाशी घेतली होती. तो बिहारच्या पश्चिम चंपारण जिल्ह्यातील मोतिहारी रघुनाथपुरम गावात राहात होता. तोदेखील याच वर्षी एप्रिल महिन्यात इंजिनीअरिंग प्रवेशासाठी आवश्यक असलेल्या जेईईच्या कोचिंगसाठी कोटामध्ये आला होता.
हे ही वाचा:
वंदे भारतमध्ये सिगारेटमुळे गोंधळ; धुरामुळे प्रवाशांची पळापळ
बांके बिहारी मंदिराच्या जमिनीची कब्रस्तान म्हणून नोंद
कळवा रुग्णालयात एका दिवसांत पाच रुग्णांचा उपचाराअभावी मृत्यू
एअर इंडियाचा नवीन लोगो, नवीन रंगसंगती
मेडिकल-इंजिनीअरिंगसह अन्य स्पर्धात्मक परीक्षांची तयारी करण्यासाठी देशभरातून दोन लाखांहून विद्यार्थी कोटा येथे येतात. येथील वार्षिक फी दोन ते तीन लाख रुपये आहे. शिवाय, खोलीत भाड्याने राहणे किंवा पेइंग गेस्ट म्हणून राहण्यासाठी आणखी पैसे मोजावे लागतात. त्यात परीक्षेच्या ताणाची भर. हा ताण सहन होत नसल्याने विद्यार्थी आत्महत्येचे टोकाचे पाऊल उचलत आहेत.